मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी लोकांना फुकट ‘रेशन’ देण्याची योजना आणखी पाच वर्षांसाठी वाढवली. लोकांना रोजगार दिला असता तर, ते स्वत:चे अन्न स्वत:च विकत घेऊन स्वाभिमानाने जगले असते, पण सरकारने गरीबांना गरीबच ठेवले व 80 कोटी लोकांना गुलाम बनवले. असे राज्यकर्ते काळाबरोबर नष्ट होतात, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – आजच्या समाजाची अवस्था रामायणातील बेडकासारखी…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा
देश पारतंत्र्यात असताना एकदा जार्ज बर्नार्ड शा म्हणाला होता, “सर्व भारतीयांनी एकदम थुंकायचे ठरविले तरी, त्यांच्या थुंकीच्या प्रवाहात ब्रिटिश साम्राज्य वाहून जाईल; परंतु हे साधे कामही अशा लोकांकडून होणार नाही.” बर्नार्ड शाचे हे बोलणे आजच्या स्वातंत्र्यातील पिढीसही लागू होते. धर्मांधता, गुलामीच्या बेड्यात अडकवून लोकांना लाचार केले जात आहे व लोक त्यातच समाधानी आहेत. समाज भिकेवर आणि दयेवर जगतो आहे, असे संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.
विन्स्टन चर्चिल म्हणतो, “सत्य हे पराभूत होते, कारण त्याचे अंगरक्षक असत्य असतात.” महाराष्ट्रासारख्या राज्यातील सत्य सध्या लांडग्यांच्या तावडीत सापडले आहे व सर्वोच्च न्यायालयाचा निवाडाही लांडग्यांच्या कळपांना मान्य नाही. स्पॅनिश भाषेत एक म्हण आहे की, “तुम्ही जर लांडग्यांच्या सहवासात राहिलात तर तुम्ही लांडग्यांसारखे वागाल. लांडग्यांसारखे आवाज वगैरे काढू लागाल.” आज सभोवतालचे चित्र यापेक्षा वेगळे दिसते काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य…, संजय राऊत यांचा भाजपावर ‘रोखठोक’ हल्ला
अनिल बर्वे यांच्या ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या गाजलेल्या नाटकात एक वाक्य आहे, “हिटलर हा माणूस होता की नाही ते सांगता येणार नाही; परंतु माणूस मात्र हिटलर असतो हे निश्चित.” राज्यकर्त्यांत चारित्र्य राहिले नाही. त्यामुळे ते खाली जनतेत उतरत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.