राज्यपाल राजीनामा देणार असतील तर ग्रेट; राऊतांचे ट्विट चर्चेत

तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील. राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच, असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

sanjay raut

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेले वक्तव्य भोवले असून त्यांची उचलबांगडी निश्चित असल्याची आणि त्यातच खुद्द राज्यपालांनी परत जाण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त सोमवारी काही वाहिन्यांवरून प्रसारित झाले. त्यानंतर लगेच राज्यपाल राजीनामा देणार असतील तर ग्रेट. हा शिवसेनेचाच विजय असल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले. मात्र राजभवनमधील सूत्रांनी राज्यपाल राजीनामा देणार असल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे.

कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच काही वृत्त वाहिन्यांनी राज्यपाल हे परत जाण्याच्या मानसिकतेत असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली ग्रेट. शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील. राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच, असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

दरम्यान, राजभवनमधील सूत्रांनी मात्र राज्यपाल राजीनामा देणार असल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याशी बोलताना राज्यपालांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे वक्तव्य केले होते. अशातच राज्यपालांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती या दोघांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या परत जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राजभवनमधील सूत्रांनी राज्यपाल राजीनामा देणार असल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.


हे ही वाचा – संजय राऊतांना पुन्हा होणार अटक? ‘या’ प्रकरणात बेळगाव कोर्टाकडून समन्स जारी