हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातच होणारच; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

जामनगर रिफायनरीवर संपूर्ण गुजरातची अर्थव्यवस्था चालते.त्याच प्रमाणे या रिफायनरीचा राज्याला पुढची १० ते १५ वर्षे फायदा होणार आहे. आशियातील सर्वात मोठी अशी ही ग्रीन रिफायनरी असणार आहे.राजापूर येथील कातळशिल्पांना या रिफायनरीमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही.सगळयांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार काम करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र

मुंबईः कोकणात होऊ घातलेला हरित तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प हा देशातील आणि आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. केंद्र सरकारच्या तीन कंपन्यांची त्यात गुंतवणूक असणार आहे. जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरीमुळे जशी गुजरातची अर्थव्यवस्था चालते, त्याप्रमाणेच या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची पुढील १०-१५ वर्षांसाठी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार आहे. त्यामुळे हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातच होणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत करण्यात येत आहे. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही यात लक्ष घालण्यास सांगण्यात येईल. तसेच या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने न्यायालयात होण्याची विनंती न्यायालयात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली होती.रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर याच्यासंदर्भात बातम्या दिल्याने त्यांचा खून करण्यात आला होता.या प्रकरणी आंबेरकर यास अटक करण्यात आली आहे. या हत्येचे पडसाद सर्वत्र उमटले होते. भाजपच्या अतुल भातखळकर,छगन भुजबळ,विरोधी पक्षनेते अजित पवार आदींनी या प्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना अजित पवार यांनी रिफायनरी प्रकल्पावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती.

जामनगर रिफायनरीवर संपूर्ण गुजरातची अर्थव्यवस्था चालते. त्याच प्रमाणे या रिफायनरीचा राज्याला पुढची १० ते १५ वर्षे फायदा होणार आहे. आशियातील सर्वात मोठी अशी ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. राजापूर येथील कातळशिल्पांना या रिफायनरीमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही. सगळयांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार काम करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाचा तपास १६ जणांच्या एसआयटीमार्फत सुरू आहे.या प्रकरणी कोणताही राजकीय दबाव आपण येऊ देणार नाही. पोलिसांनी जोमाने काम करावे यासाठी आपण स्वत: पोलीस महासंचालकांना सूचना देऊ. विनायक मेटे अपघातप्रकरणी जे बाहेरचे तज्ञ तपासासाठी बोलावण्यात आले होते त्यांचे या प्रकरणाच्या चौकशीत सहाय घेण्यात येणार आहे. वारिसे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची सानुग्रह मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केली आहे. त्यांच्या वारसांना ती लवकरच देण्यात येईल. तसेच या प्रकरणी पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची कलमे देखील लावण्यात आली आहेत. हा कायदा जर अधिक कठोर करायचा असेल तर त्याचाही विचार करू, असेही फडणवीस म्हणाले.

दोन आमदारांकडून ४० एकर जमीन खरेदी : आव्हाड
कोकणाशी संबंध नसलेल्या दोन आमदारांनी या प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी चाळीस-चाळीस एकर जमिनी विकत घेतल्या आहेत,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी केला. पंढरीनाथ आंबेरकर याने चार स्थानिक पत्रकारांना जमिनी वाटल्याचेही ते म्हणाले. त्यावर फडणवीस यांनी एखादा व्यावसायिक जमीन खरेदी करत असेल तर त्याला अटकाव करता येत नाही. पण कोण्या सरकारी अधिकाऱ्याने जर असे प्रकार केले असतील तर त्याची माहिती घेतली जाईल. महाराष्ट्रात कोणी कोणी जमिनी खरेदी केल्या आहेत याची संपूर्ण माहिती आमच्याकडे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांना सुनावले.