घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रग्राऊंड रिपोर्ट; बकर्‍या आंदोलनाच्या 'दरेवाडी' गावाची खरी परिस्थिती काय ?

ग्राऊंड रिपोर्ट; बकर्‍या आंदोलनाच्या ‘दरेवाडी’ गावाची खरी परिस्थिती काय ?

Subscribe

किरण कवडे । नाशिक

‘दप्तर घ्या, शेळ्या द्या’ अशी मागणी करत इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी (काळुस्ते) येथील विद्यार्थी व पालकांनी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. विद्यार्थी शेळ्या घेवून थेट शिक्षण विभागापर्यंत पोहोचले म्हटल्यावर संपूर्ण यंत्रणा जागी झाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तात्काळ शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. या आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी थेट शाळेला भेट देत या विद्यार्थ्यांचे समायोजन करणे हाच पर्याय योग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला दिला. त्यानंतर पालक अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी दप्तर भाम धरणात बुडवण्याचा इशारा दिला. त्यामुळे हा विषय थेट मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यामुळे गेल्या महिनाभर हे आंदोलन सर्वाधिक चर्चेत राहिले. प्रशासनाने खरोखर ही शाळा बंद केली आहे का? येथील पालक व विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे आणि प्रशासनाचा अहवाल नेमका काय सांगतो, याची प्रत्यक्ष दरेवाडीत जावून माहिती घेण्यासाठी ‘आपलं महानगर’ची टीम या गावात दाखल झाली. आमच्या प्रत्यक्ष पाहणीतून उघडकीस आलेले वास्तव घटनेवर आधारीत हा स्पेशल रिपोर्ट…

 शासनाने नव्याने वसवलेल्या दरेवाडी येथील मूळ शाळा, या शाळेत सद्यस्थितीत ३८ विद्यार्थी शिकतात.

- Advertisement -

घोटी या शहरापासून डावीकडे वळल्यानंतर आठ किलोमीटर अंतरावर काळस्ते हे गाव आहे. या गावापासून साधारणत: 500 ते हजार मीटरवर भाम धरण बांधण्यात आले आहे. 2018 मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आणि पाणी साठवण्यास सुरुवात झाली. या धरणामुळे पाण्याखाली जाणार्‍या भरवज, निरपण व दरेवाडी ही गावे विस्थापित झाली. यातील भरवज व निरपण या दोन गावांचे भाम धरणाच्या बांधाखाली असलेल्या जागेत पुनर्वसनही झाले. पण दरेवाडी या 80 कुटुंब असलेल्या गावकर्‍यांनी धरणाच्या वरच्या बाजूला साधारणत: अडीच किलोमीटरवरील माथ्यावर जागा मागितली.

 धरणाच्या पायथ्याशी असलेल्या निवारा शेड, इथेच राहतात दरेवाडीची  उर्वरित ४० कुटुंब आणि शाळेचे ४३ विद्यार्थी , हेच आहेत आंदोलनकारी नागरिक जे शाळेसाठी आग्रही आहेत.

प्रशासनाने ही जागा त्यांना दिली. मात्र, येथे घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत धरणाच्या पायथ्याशी पत्र्याचे तात्पुरते निवारा शेड उभारले. दोन ते अडीच वर्षांपासून दरेवाडीतील 40 कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय नको म्हणून जगदाळे या शिक्षिका त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये शिकवतात. परंतु, त्यांना पक्के बांधकाम असलेली शाळा येथे हवी आहे. मूळात दरेवाडी येथे पाचवीपर्यंत शाळा भरते. या शाळेत 38 विद्यार्थी शिकत आहेत. धरणाच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना सद्यस्थितीत ज्या शेडमध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी शाळा हवी आहे. पण येथून अर्धा किलोमीटर अंतरावर माध्यमिक तर, सुमारे ८०० मीटरवर आत काळुस्ते या गावची सातवीपर्यंतची शाळा आहे. येथे विद्यार्थ्यांचा पट 225 असून शिक्षकांचे प्रमाणही पुरेसे आहे.

भाम धरणाच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरुपात बसवण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सध्या 43 विद्यार्थी इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. एकट्या जगदाळे या शिक्षिका त्यांना शिकवतात.

- Advertisement -

शिक्षण विभागाच्या नियमानुसार एक किलोमीटरच्या आत दुसरी शाळा बांधता येत नाही किंवा तिला मान्यता देता नाही. त्यामुळे काळुस्तेच्या शाळेत दरेवाडीच्या शाळेतील 43 विद्यार्थ्यांचे समायोजन व्हायला हवे, असा अहवाल शिक्षण विभागाने दिला. हा अहवाल वास्तवदर्शी असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे जेथे हे विस्थापित राहतात, त्यांच्यापेक्षा अधिक अंतरावरुन हे विद्यार्थी या शाळेत येतात. मग दरेवाडी ग्रामस्थांचा विरोध का याची खात्री केली असता, त्यांना शाळाच नव्हे तर ग्रामपंचायतही स्वतंत्र हवी असल्याचे येथील ग्रामस्थांच्या बोलण्यातून उघड झाले. त्याद़ृष्टीने हा संपूर्ण लढा त्यांनी उभारलेला दिसतो.

आंदोलनकर्त्याच्या वस्तीपासून ८०० मीटर अंतरावर असलेली काळूस्थे गावातील जिल्हा परिषदेची  शाळा 

महत्वाचे मुद्दे…
  • दरेवाडी गावात दोन गट निर्माण झाल्याने गावाचे विभाजन
  • विस्थापित झालेल्या दरेवाडीतील 40 कुटुंब भाम धरणापासून अडीच किलोमीटरवरील डोंगरावर स्थलांतरीत झाले
  • उर्वरीत 40 कुटुंबांचे हे भाम धरणाच्या बांधाखाली पुनर्वसन
  • येथेच या ग्रामस्थांना स्वतंत्र शाळा व ग्रामपंचायत हवी आहे
  • येथून अवघ्या 500 मीटर अंतरावर माध्यमिक तर, 800 मीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा
  • या शाळांमध्ये जाण्यासाठी रस्ताही चांगला आहे
  • केवळ राजकीय हेतूपोटी ग्रामस्थांनी शाळेचा विषय अस्तित्वाचा प्रश्न बनवला

दरेवाडी शाळेची वस्तूस्थिती येथील ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी शिकवले जाते. येथे शिक्षकांची अधिकृत नियुक्ती नसताना त्या स्वत:च्या जबाबदारीवर शाळा चालवत आहेत. त्यांना शिक्षण विभागातर्फे संपूर्ण सहकार्य करत आहोत. : कैलास सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी, इगतपुरी

 

पुनर्वसन कायद्यांतर्गत विस्तापितांना ते मागतील तेथे सर्व सुविधा पुरवाव्या लागतात. मग आम्हाला स्वतंत्र शाळा, ग्रामपंचायत म्हणून मान्यता देण्यात काय अडचण आहे. यासंदर्भात काळुस्ते ग्रामपंचायतीने ठरावही केला आहे. त्याची पूर्तता प्रशासनाने करावी. : एकनाथ गावंडा, ग्रामपंचायत सदस्य, काळुस्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -