Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रGuillain Barre Syndrome : गुइलेन सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली, आरोग्य विभाग ऍक्शन...

Guillain Barre Syndrome : गुइलेन सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली, आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर

Subscribe

पुणे : कोरोना महामारीनंतर आता राज्यात गुइलेन सिंड्रोमने चिंता वाढवली आहे. नुकतेच शनिवारी (25 जानेवारी) पुण्यामधील एका रुग्णाचा सोलापूरमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण राज्यात आता गुइलेन सिंड्रोमबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर, राज्यात गुइलेन सिंड्रोमचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर असून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात गुइलेन सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात. (Guillain Barre Syndrome health ministery in action mode)

हेही वाचा : Guillain Barre Syndrome : राज्यात गुइलेन सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू 

गुइलेन सिंड्रोमच्या उपचारावर होणार खर्च लक्षात घेऊन पुणे महापालिकेने या रुग्णांना मोफत उपचार देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता आरोग्य विभागाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या आजाराशी संबधित रुग्णांवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. ते म्हणाले की, “पुण्यात गुइलेन सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पाण्यामुळे हे इन्फेक्शन होते, ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर आता आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या हा आजार महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या आजारवरील उपचारांसाठी रूग्णालये अनावश्यक बिल जर घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते,” अशी माहिती त्यांनी दिली. प्रतिकारक्षमता कमी झाली की गुइलेन सिंड्रोम होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.

“गुइलेन सिंड्रोमच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्यात आली. पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून 80 हजार रुपये दिले जात होते. ती आता दुप्पट करत 1 लाख 60 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी शुक्रवारी (24 जानेवारी) हा निर्णय घेतला.” अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. दरम्यान या संबंधित असलेले एक पत्र राज्य आरोग्य हमी सोसायटीने पुणे परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालकांना पाठवले आहेत.

हेही वाचा : Anna Hazare : अशा लोकांना अजिबात मत देऊ नका, अण्णा हजारेंचा मतदारांना सल्ला 

या पत्रात म्हटले आहे की, “पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये गुइलेन सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांना फुप्फुसविषयक न्यूमोनिया आजारचे निदान होते. त्यांना व्हेंटिलेटरवर उपचार घ्यावे लागत असून याबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना’ तसेच ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधील गुइलेन सिंड्रोमच्या उपचारांची रक्कम 80 हजाराने वाढवून 1 लाख 60 हजार इतकी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले होते, त्यानुसार हे पॅकेज वाढवले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे ही योजना असलेल्या रुग्णालयांमध्ये गुइलेन सिंड्रोमचे उपचार घेतल्यास ते पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. त्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे रुग्णालयांना आकारता येणार नाही. रुग्णांवर पैशांचा भार पडणार नसून संबधित रुग्णालयांची माहिती योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.