Homeमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रGulabrao Vs Gulabrao : गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर; गुलाबराव पाटलांनी...

Gulabrao Vs Gulabrao : गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर; गुलाबराव पाटलांनी म्हटले गद्दार डबल 2+

Subscribe

जळगाव – शरद पवार यांचे निष्ठावंत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याची तयारी केली आहे. मात्र पक्षाच्या जळगाव ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला आहे. जळगाव जिल्हा कार्यालयात देवकरांना पक्ष प्रवेश बंदीचे फलक लावले आहेत. पदाधिकाऱ्यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर देवकर यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान महायुतीतील सहकारी पक्ष शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकरांच्या अजित पवार गटाच्या संभाव्य प्रवेशावरुन जोरदार टीका केली. गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही वेगळा विचार केला तेव्हा देवकर अप्पा आम्हाला गद्दार म्हणाले होते. आता निवडणुकीला आठ दिवस होत नाही तर त्यांनी पक्षांतराचा विचार केला आहे. आता त्यांना गद्दार डबल 2+ म्हणायचे का? असा सवाल त्यांनी केला.

गुलाबराव पाटलांनी देकरांचं सगळंच काढलं…

गुलाबराव पाटील म्हणाले की, देवकर हे स्वतःच्या बचावासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मजूर सोसायटीचा मोठा भ्रष्टाचार केला आहे. अटलांटा प्रकरण आहे, घरकूल घोटाळ्यात चार वर्षांची शिक्षा झाली आहे. आम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणत नाही तर कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

आम्ही त्यांना सोडणार नाही – गुलाबराव पाटील 

गुलाबराव पाटील म्हणाले की, यांचा जिल्हा बँकेचा प्रॉब्लेम आहे. मजूर फेडरेशनचे दहा कोटींचा प्रॉब्लेम आहे, अटलांटा घोटाळा आहे. घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा आहे, हे सर्व बाहेर येईल आणि या सर्वांमध्ये त्यांचे हात बरबटलेले आहेत. स्वतःच्या बचावासाठी आता ते नवा पक्ष शोधत आहेत. असं काय झालं की निवडणुकीनंतर आठच दिवसांत तुम्हाला नवा पक्ष शोधावा लागत आहे. महाविकास आघाडीच्या मतदारांनी त्यांना एवढी मतं दिली ही त्यांच्यासोबत गद्दारी नाही का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

सुनील तटकरेंची घेतली भेट 

दरम्यान, गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसने स्थगिती दिली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकरांचा गुलाबराव पाटील यांनी पराभव केला. 2009 मध्ये याच मतदारसंघातून देवकर विजयी झाले होते. मात्र 2014, 2019 मध्ये गुलाबराव पाटील यांचा सलग दोनदा येथे विजय झाला. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही पालकमंत्री समोरासमोर आले होते. यात गुलाबराव पाटलांनी हॅट्रिक साधली. पराभवानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेशाची तयारी केली आहे. त्यांनी सुनील तटकरे यांची भेट घेऊन प्रवेशाची तारीख जाहीर करण्याची तयारी सुरु केली आहे. खान्देशातील मराठा समाजात त्यांचे चांगले वजन आहे. त्यांनी पक्ष सोडला तर शरद पवार गटाला तो धक्का मानला जात आहे.

हेही वाचा : Patole on Operation Lotus : पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न… काय म्हणाले पटोले

Edited by – Unmesh Khandale