आदित्य ठाकरेंनी याआधीच हे दौरे केले असते तर.., गुलाबराव पाटलांचा शिवसंवाद यात्रेवरून टोला

Gulabrao Patil

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील सर्व समीकरणं बदलून गेली आहेत. जे नेते कधीकाळी ठाकरे कुटुंबाची ढाल म्हणून ओळखले जात होते, तेच नेते आता थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तींवरच टीकेचे बाण सोडत आहेत. आदित्य ठाकरेंनी याआधीच दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसंवाद यात्रेवरून लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे. त्यामुळे यांसारखं दुसरे दुर्दैव आज नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला गुलाबराव पाटलांनी ठाकरेंना लगावला आहे.

…तर कदाचित आज ही वेळ आली नसती

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र, आदित्य ठाकरे हे तरूण असल्यामुळे त्यांनी तरी राज्याचे दौरे करायला हवे होते. परंतु आता सत्ता गेल्यानंतर ते संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. आदित्य ठाकरेंनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

दिपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

युवा सेनेच्या त्यांच्या या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरी शिंदे गटाकडून आदित्यच्या या दौऱ्यावर टीका होत आहे. तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला कल्पना नाही, प्रादेशिक अस्मिता काय असते, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.


हेही वाचा : जिलेबी कितीही आडवळणी असो पण.., फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांचं खास ट्विट