गल्ली ते दिल्ली शिवसेनेत फूट; स्थानिक नेतेही संभ्रमात

झेडपी पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत असल्याने शिवसैनिकांपुढे पेच

नाशिक : एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार, खासदारांनी शिवसेनेतून केलेले बंड थंड होण्याची चिन्हे दिसत नसून स्थानिक पदाधिकारीही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. हे नेते जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल वाजण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना डॅमेज कंट्रोल करण्यात यश येते की अपयश हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

माजी मंत्री दादा भुसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर आता खासदार हेमंत गोडसे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे. दिंडोरी नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यात रामदास चारोस्कर यांचे निकटवर्तिय नगरसेवक शिंदे गटात जाण्यास उत्सुक आहेत. तर सिन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांचे पती उदय सांगळे हे ठाकरे गटापासून अलिप्त झाले आहेत. त्यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची साथ सोडली की शिवसेना हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सिन्नरमध्ये आता दोन गट तयार झालेचे दिसून येते. दिंडोरीचे माजी जिल्हाप्रमुख तथा नवीन कार्यकारिणीत सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेले भाऊलाल तांबडे हे सध्या तळ्यात मळ्यात असल्याचे समजते.

शहरातील बहुतांश नगरसेवक हे शिंदे गटात जाण्याच्या मानसिकतेत आहेत. दिवसेंदिवस शिवसेनेला खिंडार पडत असून, दोन गटात शिवसेना विभागली जात आहे. मूळ शिवसैनिकांमध्ये असा संभ्रम तयार झाला आहे की, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडी होण्याची भिती त्यांना वाटू लागली आहेे. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा थेट सामना राष्ट्रवादीसोबत होत असल्यामुळे राष्ट्रवादी हाच पारंपारिक प्रतिस्पर्धी असल्याने त्याच्याशी मैत्री करुन राजकीय करिअर धोक्यात कसे घालयाचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला संपवण्याची उघडपणे भाषा करतात. शिवसेनेतील अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादीला पोषक वातावरण तयार होत असल्याचे दिसून येते, याचा विचार वेळीच व्हावा.

शिवसैनिकांमधील अस्वस्थतेची तीन कारणे

  • मूळ शिवसेना अर्थात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास आपल्या राजकीय भवितव्याचे काय होईल? पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कसे जुळवून घ्यायचे, असाही प्रश्न शिवसैनिकांना सतावतो आहे.
  • गेल्या 25 वर्षात शिवसेना नेत्यांना जेवढा त्रास झाला नाही, तेवढा त्रास अडीच वर्षात झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना नेत्यांचे खच्चीकरण तर केलेच शिवाय निधी मिळणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली. मंजूर केलेली कामे रद्द करत शिवसैनिकांना पुन्हा निवडणूक लढवताच येणार नाही, याद़ृष्टीने प्रयत्न केले.
  • शिवसेना नेत्यांना पक्षाकडून कुठलिही गोष्ट मिळवण्यासाठी ‘आर्थिक’ भार सोसावा लागतो. कुठलेही पद असेल किंवा उमेदवारी मिळवण्यासाठी ‘नंदिला’ पुजल्याशिवाय शंकराचे दर्शनच होत नसल्याचा राग स्थानिक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याला कंटाळून काही लोक बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत.

आदित्य ठाकरेंसमोर डॅमेज कंट्रोलचे आव्हान

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा गुरुवारी (दि.21) पासून नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. इगतपुरी ते नांदगाव, मालेगाव या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्‍यांशी ते संवाद साधणार आहेत. कार्यकर्त्यांना ‘निष्ठा’ राखण्याचे बळ ते कसे देतात, यावर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.