एसटीच्या संपानंतर गुणरत्न सदावर्तेंची भोंग्यांच्या वादात उडी, म्हणाले हनुमान चालीसा वाचन…

Gunaratna Sadavarten jumped into the argument of Hanuman Chalisa and mosque loudspeaker
एसटीच्या संपानंतर गुणरत्न सदावर्तेंची भोंग्यांच्या वादात उडी, म्हणाले हनुमान चालीसा वाचन...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या वादात उडी घेतली आहे. हनुमान चालिसावरुन सदावर्तेंनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा पठण हा गुन्हा आहे का? असा सवालच सदावर्तेंनी राज्य सरकारला केला आहे. राज्य सरकारविरुद्ध गुणरत्न सदावर्ते यांच्यातील संघर्ष जुना नाही. यापूर्वी आरक्षणासंदर्भातील लढा आणि नंतर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना दिलेला पाठिंबा यांमुळे सदावर्तेंची अडचण देखील वाढली होती. सदावर्तेंना मुंबई, सातारा, कोल्हापूर पोलीसांनी अटक केली होती.

राज्यात मशिदींच्या भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देत सदावर्ते त्यांच्यासाठी राज्य सरकारविरोधात लढत होते. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदावर्ते प्रयत्न करत होते. परंतु यादरम्यान त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे अटक करण्यात आली होती. तर आता सदावर्तेंनी मशिदींच्या भोंग्यांवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेकडून राज्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवल्यामुळे मनसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते कोर्टाच्या आदेशानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आले होते. यावेळी त्यांना राज्यात सुरु असलेल्या भोंग्यांच्या वादावरुन प्रश्न करण्यात आला. यावर ते म्हणाले की, राज्यघटनेमध्ये सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. अशामध्ये जर कोण हनुमान चालीसा पठण करत असेल तर त्याचा गुन्हा काय? ही मुस्कदाबी आहे असे म्हणत सदावर्ते यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.

शरद पवारांच्या मध्यस्थीची गरज

मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे राज्यात सामाजिक तेढ निर्माण होत आहे. त्या प्रकरणात आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचे सदावर्ते म्हणाले आहेत. दरम्यान एसटी संपातील वादग्रस्त प्रवासानंतर आता सदावर्तेंनी भोंग्यांवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

जिथे अजान तिथे हनुमान चालीसा वाजणार – राज ठाकरे

राज्यातील ज्या मशिदींमध्ये भोंग्यांवरुन अजान वाजणार तिथे हनुमान चालीसा वाजवण्यात येणार असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. आता मुंबईत ज्या मशिदी आहेत त्यातील बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत. त्याला सरकार अधिकृत भोंग्यांसाठी परवानगी देते, ही कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. अनधिकृत मशिदींवर अधिकृत भोंग्यांची परवानगी कोणासाठी आणि कशासाठी देत आहेत. दिवसभर जे काही चार ते पाच वेळा बांग दिली जाते ती जर परत दिली तर आमची लोकं हनुमान चालिसा वाजवणार म्हणजे वाजवणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. आमच्यामुळे ९२ टक्के ठिकाणी अजान झाली नाही. मला श्रेय घ्यायचे नाही. मला असे श्रेय घेण्याची इच्छा नाही. आम्ही फक्त बोललो लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली, लोकांना कळाली, अनेक मौलवींना हा विषय समजला आहे. पोलिसांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यामुळे त्यांचेही धन्यवाद, माध्यमांचेही आभार राज ठाकरेंनी मानले आहेत. महाराष्ट्र मनसैनिकांना हिंदू बांधवांना सांगायचे आहे, हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या ठिकाणी मशिदींवरील भोंगे वाजतील त्याच्या समोर हनुमान चालिसा वाजलीच पाहिजे. असे आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.


हेही वाचा : ट्रीपल टेस्ट पूर्ण न केल्यानं आरक्षण कोर्टात टिकलं नाही, कोर्टाच्या आदेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया