एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला त्यापूर्वी बैठक घेण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदावर्तेंच्या घरी मागील ६ महिन्यांपासून मॅरेथॉन बैठका होत होत्या आणि या बैठकीला एसटी कर्मचारी गट करुन येत होते. बैठकीमध्ये संपाबाबत चर्चा होत होती असे सांगण्यात येत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर या निवासस्थानी इमारतीच्या टेरेस आणि शरण क्षेत्रामध्ये बैठक होत होती.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. सदावर्ते यांनी चिथावणी दिल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदावर्ते गेल्या ६ महिन्यांपासून मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी बैठका घेत होते. एकावेळी बैठकीला ५० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी उपस्थित राहत होते. राज्यातून कर्मचारी सदावर्तेंच्या भेटीला येत होते. या बैठकीमध्ये पैशांबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदावर्ते यांच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी मागवण्यात आले आहेत. सदावर्ते यांच्या कोणी कोणी भेटी घेतल्या आणि या भेटी कशा संदर्भात झाल्या आहेत. याची माहिती पोलिसांकडून शोधण्यात येत आहे. शरद पवार यांच्या घरावर ८ एप्रिलला हल्ला झाला त्याच्या आधी सदावर्तेंच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला सदावर्ते त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि सदानंद गोडबोले नावाचा नाशिकचा व्यक्ती उपस्थित होता. या बैठकीतच कर्मचाऱ्यांना आक्रमक होण्याची सूचना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवारांच्या घरावरील हल्याचा कट सदावर्तेंचा – अभिषेक पाटील
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी दगड फेक आणि चप्पल फेक केली. या आंदोलनाचा मुख्य सूत्रधार गुणरत्न सदावर्ते होते असा आरोप करण्यात आला आहे. या आंदोलनाचा आरोप असलेल्या एका आरोपीने न्यायालयात सदावर्तेच हल्ल्याच्या मागील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. तसेच आपण फक्त कर्मचाऱ्यांना विना पैसे मदत केली असल्याचे त्यांना कोर्टात सांगितले आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. या आरोपामध्ये सदावर्तेंना अटक करण्यात आले आहे.
हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंनी केली अयोध्या दौऱ्याची घोषणा, तारीखसुद्धा ठरली