Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शिंदे-फडणवीस सरकारमधील अर्धा डझन मंत्री नाराज; वजनदार नेत्यांना दुय्यम खाती

शिंदे-फडणवीस सरकारमधील अर्धा डझन मंत्री नाराज; वजनदार नेत्यांना दुय्यम खाती

Subscribe

एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी महत्त्वाची खाती ठेवत पक्षातील इतर प्रतिस्पर्ध्यांचे पंख छाटण्याचे काम केल्याचं सांगितलं जातंय.

मुंबईः जवळपास 40 दिवसांनंतर शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा सहा दिवसांपूर्वी विस्तार झालेला असून, 18 मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर झालंय. परंतु त्या खातेवाटपावरूनच आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. भाजपमध्ये सर्वाधिक हेवीवेट खाती ही उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. दुसरीकडे संघाच्या मुशीत तयार झालेले चंद्रकांत पाटील यांनाही त्यांच्या वजनाच्या तुलनेत कमी महत्त्वाची असलेली उच्च व तंत्रशिक्षण, वस्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री ही दुय्यम खाती देण्यात आली आहेत.

नितीन गडकरींचे खंदे समर्थक असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनाही वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय ही फारशी महत्त्वाची नसलेली खाती मिळालेली आहेत. तसेच फडणवीसांचे समर्थक असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे मात्र ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण अशी वजनदार तीन खाती सोपवण्यात आली आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास अशी मलाईदार खाती देऊन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी महत्त्वाची खाती ठेवत पक्षातील इतर प्रतिस्पर्ध्यांचे पंख छाटण्याचे काम केल्याचं सांगितलं जातंय.

- Advertisement -

सहा टर्म आमदार राहिलेल्या मंगल प्रभात लोढा यांनाही पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास ही मंत्रिपदं देण्यात आलीत. त्यामुळेच भाजपमधील काही मंत्री नाराज आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटातही फारसं आनंदाचं वातावरण नाही. शिंदे गटातील मंत्रिपदावरून आमदार आणि मंत्री दादा भुसे नाराज असल्याचंही सांगितलं जातंय. दादा भुसे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री होते, परंतु शिंदे-फडणवीस विस्तारात त्यांना बंदरे व खनिकर्म असं दुय्यम खाते देण्यात आले आहे. तर अब्दुल सत्तार यांना कृषिमंत्रिपद मिळाले आहे. तसेच शंभुराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या गृह राज्यमंत्रिपदाच्या तुलनेत थेट उत्पादन शुल्क विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.

विशेष म्हणजे दादा भुसे यांना हलके मंत्रिपद मिळाले असल्याने ते नाराज असल्याची त्यांच्याकडे विचारणा केली असता, मंत्री दादा भुसे यांनी आपण मिळालेल्या मंत्रिपदावर नाराज नसल्याचे सांगत आपल्या मागणीनुसारच हे मंत्रिपद मिळाले असल्याचे स्पष्टीकरण दिले. कृषी विभागात काम करत असताना वारंवार होणारा प्रवास आणि वारंवार अवकाळी पावसामुळे प्रत्येक ठिकाणी नुकसानी संदर्भात पोहोचताना होणारा त्रास लक्षात घेता आपणच हे खातं नको असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. दीपक केसरकर यांना हे शिंदे गटाचे प्रवक्त असून, त्यांनी वेळोवेळी शिंदे गटाची बाजून लावून धरली आहे. पण दीपक केसरकरांना शालेय शिक्षण व मराठी भाषा असं दुय्यम दर्जाचं खातं देण्यात आलंय, त्यामुळे ते नाराज आहेत. तर संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन खातं देण्यात आलंय.

- Advertisement -

या मंत्र्यांच्या नाराजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा भाष्य केलं होतं. खाते कुठले आहे हे महत्त्वाचे नसून ते चालवणारी व्यक्ती योग्य असली पाहिजे, असंही ते म्हणालेत. मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना दुसऱ्या टप्प्यात स्थान मिळेल. खात्यात अदलाबदल करण्याची गरज भासल्यास आम्ही एकत्रित बसून चर्चा करू, असाही सावध पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

खरं तर शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या काही आमदार आणि मंत्र्यांच्या पदरी निराशा पडल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे 13 खाती ठेवली असून, त्यात दुसऱ्या विस्तारात इतर मंत्र्यांना वाटप होणारी खातीही त्यांच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे येत्या काळात शिंदे गटातील नाराज आमदार आणि मंत्र्यांना समजवण्यासाठी एकनाथ शिंदेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


हेही वाचाः पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे प्रत्युत्तर, म्हणाले, ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -