घरताज्या घडामोडीमालाड येथील रस्ता रुंदीकरणात २७ बांधकामांवर हातोडा, वाहतूक समस्या लवकरच सुटणार

मालाड येथील रस्ता रुंदीकरणात २७ बांधकामांवर हातोडा, वाहतूक समस्या लवकरच सुटणार

Subscribe

मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील मालाड परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाअंतर्गत बाधक ठरणाऱ्या २७ बांधकामांवर पालिकेने सोमवारी हातोडा उगारत ती बांधकामे जमिनदोस्त केली. महापालिका उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ‘पी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

मुंबईत रस्ते वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम उपनगरातील रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. त्याच अनुषंगाने, मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत.

- Advertisement -

कुरार गांव आणि गोरेगांव-मुलूंड जोडमार्ग यांना जोडण्यासाठी महालकारी रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून जी. जी. महालकारी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेली २७ बांधकामे हटविण्याची कार्यवाही पी/उत्तर विभाग कार्यालयाने सोमवारी पार पाडली.

सध्या सुमारे १२ मीटर रुंद असलेला हा रस्ता आता १८.३० मीटर रुंद करण्यात येणार आहे. या रुंदीकरण रेषेत अडथळा ठरत असलेली २२ व्यावसायिक व ५ रहिवासी, अशी एकूण २७ बांधकामे हटविण्याची कारवाई सोमवारी करण्यात आली.

- Advertisement -

सदर बांधकामे काढण्यासाठी दोन जेसीबी संयंत्र, एक डंपर, वीस कामगार आणि सहा अभियंते प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी कार्यरत होते. आता लवकरच महापालिकेच्या रस्ते विभागामार्फत सदर रस्त्याचे रुंदीकरण व विकास काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.


हेही वाचा : मुंबईतील हिमालय पुलाचे काम युद्धपातळीवर, मार्चअखेरीस सुरू होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -