नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनावर 29 एप्रिलला होणार सुनावणी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका आता अमरावतीचे खासदार नवनीत राणा त्यांचे पती आमदार रवी राणा यांची चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आज त्यांना वांद्रे हॉलिड कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए.ए.घनीवाले यांनी हा निर्णय दिला आहे. दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर आता 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे रवी राणा यांना आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात पुढील 14 दिवस काढावे लागणार आहे. आज कोर्टात सरकारतर्फे अॅडव्होकेट प्रदीप घरत तर राणा दाम्पत्यातर्फे अॅडव्होकेट रिझवान युक्तिवाद करत होते

पोलिसांकडून रिमांड कॉपीतून राणा दाम्पत्यांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही राणा दाम्पत्यांवरील आरोप गंभीर असल्याचे म्हणत ही मागणी लावून धरली. मात्र राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याची म्हणत राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीचा तीव्र विरोध दर्शवला. तब्बल 20 मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहे. या दोघांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 135 अ, 34, r/w 37(1) 135 नुसार कारवाई करण्यात आली. त्याच्यावर वेगवेगळ्या समुदायांमध्ये द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. तर 353 कलमाअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल आहे. सरकारी कामात व्यत्यय आणल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणालाही जाण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते, तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मात्र तरीही मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापर त्यांनी हनुमान चालीसा पठणाचे आव्हान दिले. नोटिशीला न जुमानता राणा दाम्पत्याने शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळे त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


सोमय्यांनी विनाकरण संघर्ष वाढवण्याचे काम करायला नको होते; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील