हनुमान जयंती : नवनीत राणांना ‘हिंदू शेरणी’ची उपमा; मुंबई-अमरावतीत झळकले पोस्टर्स

Navneet Rana posters
हिंदू शेरनी असा उल्लेख करत नवनीत राणेंचे पोस्टर्स झळकले

मुंबई – हनुमान चालीसाप्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नवनीत राणा यांचे हनुमान जयंतीनिमित्त अमरावती आणि मुंबईत बॅनर्स लागले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या बॅनर्सवर नवनीत राणा यांचा हिंदू शेरणी असा उल्लेख केला आहे. ६ एप्रिलला हनुमान जयंती असून अमरावतीत जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी पाडव्याला जनतेला संबोधित करताना राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा छेडला होता. भोंगे हटवले नाही तर मशिदीसमोर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला त्यांनी आव्हान दिलं होतं. यावरूनच खासदार नवनीत राणा यांनीही आक्रमक भूमिका घेऊन तत्कालीन महाविकास आघाडीला धारेवर धरलं. एवढंच नव्हे तर मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला. परंतु, मातोश्रीवर येताच पोलिसांनी राणा दाम्पत्याला रोखलं होतं. पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांना त्यांना १४ दिवस तुरुंगात ठेवलं.

या सर्व प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा कार्यकर्त्यांचा राणा दाम्प्त्याला पूर्ण पाठिंबा मिळाला होता. आता हनुमान जयंतीनिमित्त पुन्हा एकदा नवनीत राणा चर्चेत आल्या आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे मुंबई आणि अमरावतीत पोस्टर्स लागले आहेत.

अमरवातीत हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जाणार आहे. या मूर्तीचा फोटो बॅनरवर छापण्यात आलाय. हिंदुत्त्व हाच श्वास धर्मरक्षणाची आस असा संदेश बॅनरवर लिहिण्यात आला आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीला डिवचण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा पोलीस ठाण्यातील फोटोही या बॅनरवर छापण्यात आलाय.

अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात हनुमान मंदिर उभारले जात आहे. या मंदिरात १११ फूट उंचीची मूर्ती उभारण्यात येणार आहे. या भव्य मूर्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. ६ एप्रिल रोजी या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे.