नाशिक : बहुचर्चित शिक्षक भरतीला राज्यात सुरुवात झाली असून, ३० हजार जागांसाठी राज्यभरात भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत स्वप्रमणपत्र पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे अनेक वर्षापासूनचे शिक्षण होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
सहा महिन्यांपूर्वीच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा दिलेल्या दोन लाख १६ हजार विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सूचना या https://mahateacherr ecruitment.org.in/ संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियेनंतर रिक्त असलेल्या जागांची माहिती पोर्टलवर प्रदर्शित केली जाणार आहे. परंतु, ढोबळ मानाने ३० हजार जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गुणवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील. त्यानंतर निवड यादी तयार करूनच नियुक्ती दिली जाणार आहे. गतपरीक्षांमध्ये गैरप्रकार करणार्या तसेच संबंधित गैरप्रकारात सहभाग असल्याचे आढळून आल्याने संबंधितांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्पष्टपणे आदेशित केल्याचे शिक्षण आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
शिक्षकदिनीच गुरूजींचे रजा आंदोलन
शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे दिली जात असल्याच्या निषेधार्थ राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनीच एक दिवसीय किरकोळ रजा सामूहिक आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनातून शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी डॉ. मीता चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप मोहन रणदिवे व केंद्रप्रमुख आर. बी. निकुंभ आदींसह तालुका प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला आघाडी राज्य प्रतिनिधी आशा भामरे, जिल्हा कोषाध्यक्ष शैलेश आहेर, जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद निकम व वाल्मीक चव्हाण, तालुका नेते रवींद्र भदाणे, तालुका अध्यक्ष दत्तू कारवाळ, सरचिटणीस राजेंद्र सोनार, महिला आघाडी तालुका अध्यक्षा वैशाली भामरे, सरचिटणीस मीना शेवाळे, तालुका पदाधिकारी प्रदीप महाले आदींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.