घरमहाराष्ट्रहापूस इलो... पण त्याका कोण बापूस नाय!

हापूस इलो… पण त्याका कोण बापूस नाय!

Subscribe

हापूस आंबा एपीएमसीत आला अपेक्षित भाव नसल्याने अडचणीत शेतकर्‍यांच्या पदरात निराशा !

 करोनाच्या संकटापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका महिनाभर सहन केल्यानंतर अखेर कोकणातील हापूस आंबा आता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहचला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तब्बल एक महिनाभर आर्थिक संकट सहन करून हतबल झालेल्या कोकणातील शेतकर्‍याच्या आंब्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने पुन्हा एकदा पदरात मोठी निराशा पडली आहे. सुमारे १ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या कोकणातील आंबा उत्पादक कर्जाच्या खाईत पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यात आंब्याचा मोसम असल्याने, याच काळात करोनाचे संकट आल्याने आधीच अडचणीत असलेल्या आंब्याची अवस्था आणखी बिकट झाली. तब्बल एक महिना हापूस आंब्याचा एपीएमसी मार्केटमध्ये येण्याचा मार्ग ठप्प झाला होता. २१ मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २३ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान तब्बल एक महिना हापूस आंबा शेतात अडकून पडला. कोकणातील आंबा शेतकरी त्यामुळे हवालदिल झाला होता.

- Advertisement -

मात्र , शेतकर्‍यांवरील संकट पाहता शासनाने आता आंबा वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना हापूस आंबा आता एपीएमसी मार्केटमध्ये पोहचू लागला. सध्या सिंधुदुर्ग, देवगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील हापूस आंब्यासह राज्यातील इतर ठिकाणचा आंबा एपीएमसीत येत आहे. करोनाचे संकट आणि सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन सध्या एपीएमसीतील फळ मार्केटमध्ये दररोज फक्त १०० गाड्यांना परवानगी दिली जात आहे. दररोज सुमारे ५० हजार पेट्या आंबा एपीएमसी मार्केटमध्ये येत असल्याची माहिती फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.

सध्या कोकणातून काही गाड्यांतून हापूस आंबा एपीएमसी मार्केटमध्ये येत आहे. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये थेट ग्राहक नाही. आंब्याची आवक देखील कमी आहे. करोनाचे संकट आणि मार्केटच्या परिस्थितीमुळे शेतकर्‍याला हवा तो भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. व्यापारी बोलेल तो भाव नाईलाजास्तव शेतकर्‍याला मान्य करावा लागतो. शेतकरी एपीएमसीत घेऊन येत असलेल्या आंब्याला किमान ३०० रुपये ते ३५० रुपये प्रत्येक डझनाप्रमाणे भाव मिळणे शेतकर्‍याला अपेक्षित आहे. मात्र १५० ते २०० रुपये डझनप्रमाणे आंबा द्यावा लागत आहे. पण नाईलाजास्तव हे करणे भाग असल्याचे कोकणातील आंबा शेती अभ्यासक रमेश जोशी यांनी संगितले.

- Advertisement -

कोकणातून मुंबईपर्यंत दळणवळणावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ३०० ते ३५० हा किमान भाव आहे. या एकूणच परिस्थितीवर, उत्पादन आणि वाहतुकीवर होणारा खर्च जास्त आहे. त्यामुळे एपीएमसीत ४ डझनाच्या पेटीला, ६ डझनाच्या पेटीला १२०० रुपये किंवा १५०० रुपये मिळणे परवडणारे नसल्याचे दापोलीतील आंबा शेतकरी मयूर मंडलिक यांनी सांगितले.

करोना विषाणूने एपीएमसीत आपले पाय पसरविल्याने एपीएमसीत येणार्‍या गाड्यांना काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. गाड्यांची संख्या आणि मार्केटमध्ये येण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दररोज रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंतच्या काळात फक्त १०० गाड्यांची आवक करण्यास परवानगी दिली आहे. समजा पहाटे ४ वाजताच १०० गाड्यांचा आकडा पूर्ण झाला तरी वेळ उरला म्हणून एकाही गाडीला प्रवेश दिला जात नाही. वेळ आणि गाडी संख्येचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याने १०० गाड्यांनंतर किंवा पहाटे ५ वाजल्यानंतर येणार्‍या गाडीला दुसर्‍या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. सध्या कोकणातील येणार्‍या आंब्याची सुमारे ७५ लाख रुपयांची दररोजची उलाढाल असल्याचा अंदाज पानसरे यांनी व्यक्त केला आहे.

दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊच्या काळात आंबा वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी मे महिन्यात एपीएमसीत आंबा येण्याचा मार्ग खुला राहणार आहे. साधारणतः कोकणातील सिंधुदुर्ग- देवगडमधील आंब्याचा व्यापार १० ते १५ मे पर्यंत चालेल. तर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यापार २५ ते ३० मे पर्यंत चालेल. रायगड जिल्ह्यातील आंबा १० जून पर्यंत चालेल, असा अंदाज आहे. गुजरातचा आंबा १५ मे ते २० जून , जुन्नर मधील आंबा १० जून ते १५ जून अखेरपर्यंत चालणार आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये संपूर्ण राज्यातून आंब्याची आवक होते. मात्र, दररोज फक्त १०० गाड्यांना फळ मार्केटमध्ये प्रवेश आहे. यामध्ये इतर राज्यातील गाड्यांचा देखील समावेश असतो. कोकणातील दरवर्षीचा आंबा व्यापाराची उलाढाल हजारो, करोड रुपयांची आहे. लॉकडाऊनच्या काळात आंब्याचा निम्मा सिझन संपला असून जेमतेम एक महिना उरला आहे. एपीएमसीत किती गाड्या येतील यावर बंधने आहेत. त्यामुळे आपल्या व्यवसायातील तोटा रोखण्यासाठी कोकणातील आंबा शेतकर्‍याला आणखी नवीन मार्ग निवडावे लागतील हे मात्र निश्चित आहे.

हापूस इलो… पण त्याका कोण बापूस नाय!
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -