कोकणातील ‘हापूस’ हंगाम यंदा उशिरा; कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत

hapus mango hit by changing climate in sidhudurg ratnagiri

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होतोय, याचा मोठा फटका हा शेती पिकांना सहन करावा लागतोय. याचा मोठा फटका कोकणातील हापूस आंबा पिकांनाही बसला आहे. या वातावरण बदलांमुळे आता हापूस आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात आता थंडीसोबतच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहोर काळा पडू लागला आहे. तसेच सिंधुदुर्गमधील आंबा पिकावर तुडतुड्यासारख्या किड रोगांचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे यंदा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने सुरु होणार आहे.

सतत बदलत्या वातावरणामुळे फळांचा राजा आंब्याला फटका सहन करावा लागतोय. यामुळे यंदा बाजारपेठांमध्ये कोकणातील आंबा उशीराने दाखल होण्याची शक्यता आहे. यात फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे फवारणीवर होणारा खर्च, दळणवळण, मजुरी आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा मेळ बसवणे कठीण होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.

दरवर्षी वाशी बाजाप समितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याची आवक होण्यास सुरुवात होते. यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगामाला मोठी सुरुवात होते. मात्र यंदा आंब्याचं उत्पादन कमी राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. परतीच्या पावसामुळे आधीच आंब्याचा मोहोर गळून पडला. यात अवकाळी पाऊस आणि अचानक वाढती थंडी पाहता आहे तो मोहरही काळा पडतोय. त्यामुळे आंब्याची पहिली पेटी वाशी बाजार समितीमध्ये दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यास अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे.


कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील अंतिम भुयारीकरणाचे काम पूर्ण