‘हर हर महादेव’ वादात उतरले खुद्द राज ठाकरे; पुण्यात घेतली ‘या’ व्यक्तीची भेट

har har mahadev movie controversy mns president raj thackeray meet gajanan mehendale in pune

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हर हर महादेव चित्रपटामुळे राज्यात चांगलाच गदारोळ पाहायला मिळतोय. या वादात राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा वाद आता विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना या चित्रपट गृहातील हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडत प्रेक्षकांना मारहाण केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेडचाही या चित्रपटाला विरोध असून बऱ्याच चित्रपटगृहातील शो बंद पडले आहेत. तर दुसरेकडे मनसेने या चित्रपटाला समर्थन करत ठाण्यात मोफत शोचे आयोजन केले. यामुळे हर हर महादेव चित्रपटातून आता राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध मनसे असा नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. या वादात आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज पुण्यात इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांची भेट घेतली आहे. चित्रपटावरून पेटलेले राजकारण पाहता राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

राज ठाकरेंच्या भेटीबाबत इतिहास अभ्यासक मेहेंदळे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे आणि आमची भेट काही नवीन नाही, यापूर्वीही आम्ही भेटत होतो. बाबासाहेब पुरंदरे हयात असताना त्यांची भेट घेतल्यानंतर ते माझी भेट घ्यायचे. राज ठाकरेंना इतिहास आणि एकूण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासाबाबत एक कुतुहल आहे, त्यामुळे ते सातत्याने त्यांचे प्रश्न आमच्याकडून जाणून घेत असतात. आजही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल दहा प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून जाणून घेतली. अशी माहिती त्यांनी दिली.

हर हर महादेव या चित्रपटाला स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हॉइस ओवर दिला आहे. या चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. मात्र या चित्रपट प्रदर्शनाच्या दोन दिवसांनी छत्रपती संभाजी राजेंनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला.

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे. असा आरोप संभाजी राजेंनी केली, तसेच आगामी चित्रपट वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरही आक्षेप घेतला आहे. यात आता राज्यात ‘हर हर महादेव’चा शो बंद करण्याची भूमिका राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. मात्र मनसेने याला विरोध करत पुन्हा शो सुरु केला आहे.

या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चित्रपटाविषयी आपली भूमिका मांडण्यास बंदी घातली आहे. तसेच योग्य वेळी मी आपलं मत मांडेन असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आज पुण्यात इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भविष्यात राज ठाकरे याबाबत काय भूमिका मांडतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


‘वर्कलोड मॅनेजमेंट’वरून सुनील गावस्करांनी भारतीय खेळाडूंना फटकारले; म्हणाले…