घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजातपंचायतीच्या अनिष्ठ प्रथांविरोधात लढण्यासाठी कोमल बनल्या वज्राहून कठोर

जातपंचायतीच्या अनिष्ठ प्रथांविरोधात लढण्यासाठी कोमल बनल्या वज्राहून कठोर

Subscribe

नाशिक : येथील कोमल वर्दे यांनी अंनिसच्या माध्यमातून पीडित महिलांसाठी चळवळ सुरू केली. विधवा महिलांचा पुनर्विवाह तसेच आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. बेटी
बचाओ, बेटी पढाओ, फटाकेमुक्त दिवाळी, विधवा महिलांचा हळदी- कुंकवाचा कार्यक्रम, शेतकरी महिलांच्या प्रश्नांसाठी
सुरू केलेला लढा, बलात्कार पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी लढलेली न्यायालयीन लढाई, भुताळीण ठरविलेल्या महिलांचा प्रश्न अशा विविध माध्यमातून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

वडिलांच्या मृत्यूनं तर आपल्या आईला समाजाच्या जात पंचायतीकडून अनिष्ट प्रथा करण्यासाठी प्रवृत्त केल्याने या कुप्रथेविरोधात नाशिकच्या कोमल वर्दे यांनी प्रदीर्घ काळ संघर्ष करून त्या पंचांना अखेर तुरुंगात धाडले. जात पंचायतीने बहिष्कृत केल्यानंतर आपल्याच जातीतील लोकांकडून होणारा छळ व दबावाला न जुमानता कोमल यांनी दिलेला हा लढा समाजातील प्रत्येक महिलेला लढण्यासाठी प्रेरणा देणारा असाच आहे.

- Advertisement -

कोमल वर्दे या येवला तालुक्यातील काशी कापडी समाजाच्या कुटुंबातील एक सर्वसामान्य महिला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईला तूप लावून प्रेतासोबत आंघोळ घातली गेली. स्मशानात दहाव्याचा कार्यक्रम झाल्यावर इतर विधवा महिलांनी सुहासिनीचा पूर्ण साज, कुंकू पुसले, मंगळसूत्र उतरवले, हिरव्या बांगड्या फोडल्या, पायातील जोडवे काढले व तिला तेथेच आंघोळ घातली. पांढऱ्या रंगाची साडी घालण्यास दिली व तिचे तोंड कोणी पाहू नये, असे सांगितले गेले.  कारण ते अपशकुन मानतात म्हणून तोंड पदराने पूर्णपणे झाकले व तिच्या वाटेत कोणालाही येऊ न देता तिला घरी नेऊन अंधाऱ्या खोलीत एकटीला रात्रभर ठेवले. तिला जेवण इतर विधवा दाराखालून लोटून देतात. हे सर्व जात पंचायतीतील पंचांच्या उपस्थितीत झाले. या अनिष्ट प्रथेविरुद्ध जात पंचायतीच्या पंचांकडे त्यांनी पदर पसरून भीक मागितली की या प्रथा आईवर लादू नका, पण त्यांनी या अनिष्ट प्रथा आम्ही करणार, असे म्हणत कोमल आणि परिवाराला बहिष्कृत केले.

कोमलला वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही. त्यामुळे त्यांनी या अनिष्ट प्रथेविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला. त्यांना अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांची साथ मिळाली. येवला पोलीस ठाण्यात संबंधित पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या पंचांना अटक केली. आजही न्यायालयात ही केस सुरू आहे. कोमल वर्दे यांनी सहा वर्षांपासून अंनिसच्या माध्यमातून जात पंचायतीविरोधात मोठा लढा उभारला आहे. आपल्या सारख्याच अनेक महिला पीडित आहेत. त्यांना बहिष्कृत केले जात असून कुणाचेही पाठबळ मिळत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी याविरोधात लढा पुकारला आहे. त्यामुळे अनेक महिलांनी पुढे येत त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांनी या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जागतिक महिला दिनानिमित्त कोमल वर्दे यांच्या संघर्षाला सलाम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -