घरमहाराष्ट्रसर्व आघाड्यांवर सरकार अपयशी - हार्दिक पटेल

सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी – हार्दिक पटेल

Subscribe

हार्दिक पटेल यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. जालना येथे बोलत असताना त्यांनी मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी मुद्यांवर सरकारवर सडकून टिका केली.

ज्या सिंदखेड राजाच्या मातीनं अन्याय, अत्याचाराविरोधात लढायला शिकवले. त्याच मातीतील शेतकरी महिला जर सरण रचून आत्महत्या करणार असतील तर भाजप सरकारनं चार वर्षात केलं काय? असा सवाल हार्दिक पटेल यांनी विचारला आहे.  मराठा फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित सभेत जालनामध्ये बोलत असताना त्यांनी हा सवाल केला आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगार युवक, महिलांवर वाढणारे अत्याचार या साऱ्या गोष्टी असताना देखील सरकार केवळ आकड्यांचे खेळ करत आश्वासनांची खैरात करत आहे. त्यामुळे सरकारविरोधात केवळ बोलून नाही तर आता करून दाखवा असं आवाहन देखील हार्दिक पटेल यांनी केलं आहे.

महाराष्ट्रामध्ये ५ हजार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येसाठी भाजप सरकार जबाबदार आहे. सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतेही ध्येय धोरण राबवले नाही. वाढत्या आत्महत्यांवर उपाय शोधण्यापेक्षा इतर राज्यापेक्षा आमच्या राज्यात कमी आकडे आहेत असं सरकार निर्लज्जपणे सांगत असल्याची टीका देखील यावेळी हार्दिक पटेल यांनी केली. उद्योजकांना लाल गालिचा आणि जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला सरकारनं आत्महत्या हा पर्याय ठेवल्याची टिका हार्दिक पटेल यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये  मराठा समाज जास्त आहे. पण, उद्योगधंदा आणि नोकऱ्यांमध्ये मात्र मराठ्यांना कुठलेच स्थान नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवकांची फळी निर्माण झाली आहे. सरकारनं त्यांना आरक्षणाची भिक न देता त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व द्यावे. अन्यथा महाराष्ट्रातील मराठा समाज आगामी निवडणुकीमध्ये ताकद दाखवेल असा इशारा हार्दिक पटेल यांनी सरकारला दिला आहे.

- Advertisement -

कोणताही मुख्यमंत्री, आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या मुलांकडे पाहा. त्यांची मुलं बेरोजगार नाहीत. मात्र बळीराजाच्या मुलांना जाणूनबुजून बेरोजगार ठेवण्याचं काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये युवकांनी न्याय, हक्क मिळवून देणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन देखील हार्दिक पटेल यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -