घरमहाराष्ट्र'हरामखोर' शब्द संसदीय झाला की अर्थ बदलला? भाजपाच्या महिला नेत्याकडून वारंवार उल्लेख

‘हरामखोर’ शब्द संसदीय झाला की अर्थ बदलला? भाजपाच्या महिला नेत्याकडून वारंवार उल्लेख

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी साधारणपणे तीन वर्षांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत हिच्याबद्दल बोलताना ‘हरामखोर’ शब्दाचा वापर केला होता. यावरून मोठा गदारोळ झाला होता. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण आता भाजपाच्या एका महिला नेत्याकडून या शब्दाचा वारंवार वापर होत असल्याने हा शब्द संसदीय झाला आहे का? की त्याचा अर्थ बदलला आहे? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईतील सुरक्षेची तुलना पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरशी केल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकार संतप्त झाले होते. यावरून कंगना आणि तत्कालीन ठाकरे सरकार यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगनाबद्दल बोलताना ‘हरामखोर’ म्हटले होते. त्यावरून वागंद निर्माण झाल्यावर संजय राऊत यांनी याबाबत खुलासा केला होता. हरामखोर म्हणजे ‘नॉटी’ असा एक नवीनच अर्थ त्यांनी सांगितला आणि त्यावरूनही ते सोशल मीडियावर ट्रोल झाले.

- Advertisement -

पण सध्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या सर्रास या शब्दाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. आज (मंगळवारी) त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका वकील युवतीला शिवीगाळ करत भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना त्यांनी या व्हिडीओद्वारे विषद केली आहे. तळपायाची आग मस्तकात नेणाऱ्या या प्रकारात या ‘हरामखोर’ आरोपीला बेड्या ठोकायला पुणे पोलीस कुणाची वाट पहात आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

तर, काल (सोमवारी) नाशिकमधील सिन्नर येथे एका महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना त्यांनी ट्विटरवरून सांगितली आहे. यातही त्यांनी आरोपींचा उल्लेख ‘हरामखोर’ असाच केला आहे. तर, हिंगोलीमध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर 8 फेब्रुवारी 2023 रोजी हल्ला करण्यात आला होता. याबद्दलचा निषेध करण्याचे ट्वीट चित्रा वाघ यांनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी केले होते. त्यात हल्लेखोराचा त्यांनी ‘हरामखोर’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे हा शब्द संसदीय झाला आहे की त्याचा अर्थ बदलून ‘नॉटी’ झाला आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

महिला अत्याचाराबद्दलचा संताप चित्रा वाघ यांच्या ट्वीटमधून व्यक्त होत असतो. अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे, असे प्रत्येकाचे मत आहे. पण तरीही साधनशूचिता आणि शब्दांबद्दल जागरूक असणाऱ्या भाजपा नेत्यांनी त्याबाबत संयम दाखवावा, असे मत काही नेटिझन्सने व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -