घरताज्या घडामोडीसरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली, असं फडणवीस सांगत नसतील ना!  

सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली, असं फडणवीस सांगत नसतील ना!  

Subscribe

गुरुवारी भाजप राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. ‘सर्व घटकांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. या सरकारचे १०० अपराध भरले आहेत. १०० अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरच्या जनतेला, नागरिकांना मिळाली आहे. या निवडणुकीत यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात, तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा,’ असे फडणवीस पंढरपूरच्या सभेत म्हणाले होते. परंतु, हा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ‘करेक्ट’ वेळेची ते वाट पाहत होते.

गुरुवारी भाजप राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. गेल्या काही दिवसांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. आता राज्य कार्यकारणीनेच पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याने राज्यभर भाजपकडून सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिले.

- Advertisement -

अजित पवार यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ राबता असणारे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरण्याचा कार्यक्रम भाजपने सुरु केला असून येणारे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ठाकरे सरकारला जड जाण्याची शक्यता आहे.

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना लक्ष्य करत त्यांच्या राजीनाम्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदावरून गच्छंती केली असताना आता भाजपने आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे वळवला आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने लिहिलेल्या चार पानी पत्रात अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर पैसे वसुलीची आरोप केला होता. त्यामुळे या दोन मंत्र्यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यावरून आता भाजप रान उठवणार हे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी पैसे वसुलीचे आदेश दिल्याचे लिहिले होते. त्यावरून अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होऊन त्यांना गृहमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले. तसाच आरोप सचिन वाझे याने चार पानी पत्र लिहून केला होता. आपल्याला अजित पवार आणि अनिल परब यांनी पैसे वसुलीचे आदेश दिले होते, असे वाझेने आपल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे पैसे वसुलीच्या प्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात येणार आहे. तसा ठराव गुरुवारी झालेल्या भाजप कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला. अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आता महाराष्ट्र राज्य भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच या मागणीसाठी आंदोलन करण्याचा पवित्राही घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच प्रदेश भाजपकडून करण्यात आले.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले. जनतेला जेरीस आणलेल्या या सरकारने गुन्हेगारांना मात्र सुरक्षा कवच पुरवले आहे.  वाजे प्रकरण, गृहमंत्र्याचे खंडणी वसुली प्रकरण, पोलिस खात्यातील बदली, भ्रष्टाचार अशा अनेक  प्रकरणामुळे ठाकरे सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. सचिन वाझें यांच्या पत्रातील उल्लेखाच्या आधारे अनिल देशमुख यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, असे भाजपने राजकीय ठरावात म्हटले आहे.

आशिष शेलार विसरले

प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजप आमदार आशिष शेलार हे अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मांडणार होते. मात्र, शेलार तो ठराव मांडायला विसरले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात तो ठराव मांडला. आशिष शेलार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असलेल्या जवळकीमुळे शेलार तो ठराव मांडायला विसरले नसतील ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -