घरमहाराष्ट्रमुश्रीफांचे भागीदार चंद्रकांत गायकवाड ईडीच्या फेऱ्यात; चौकशीचे समन्स

मुश्रीफांचे भागीदार चंद्रकांत गायकवाड ईडीच्या फेऱ्यात; चौकशीचे समन्स

Subscribe

मुंबईः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. गायकवाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचीही ईडी चौकशी करणार आहे.

गायकवाड हे ब्रिक्स कंपनीचे प्रमुख आहेत. ते मुश्रीफ यांचेही निकटवर्तीय आहेत. ईडीने बजावलेल्या समन्सनुसार त्यांना ३० मार्च रोजी चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

- Advertisement -

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरणांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय यावर ईडीने धाड टाकली आहे.

मुश्रीफ यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही ईडीने बजावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीकडून मिळालेल्या समन्सवर आपली भूमिका स्पष्ट केली. “पहिल्या केसमध्ये माझं नावच नव्हतं. ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्याप्रकरणी मला समन्स बजावण्यात आलाय. या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. पण ईडीला उत्तर देताना मी तसं सांगणार आहे. त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisement -

त्यानंतर मुश्रीफ यांनी ईडीच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने मुश्रीफ यांना दिलासा दिला. मुश्रीफ यांच्यावर तूर्त तरी अटकेची कारवाई करु नये. या काळात मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी प्रलंबित आहेत. तसेच मुश्रीफ हे चौकशीसाठी ईडी कार्यालयातही हजर झाले होते. तब्बल दोन तास मुश्रीफ यांची ईडीने चौकशी केली. आता थेट मुश्रीफ यांच्या निकटवर्तीय गायकवाड यांनाच ईडीकडून चौकशी समन्स आले आहे. हा मुश्रीफ यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -