घरमहाराष्ट्रशिल्पकलेच्या माध्यमातून तो देतोय त्याच्या स्वप्नांना आकार

शिल्पकलेच्या माध्यमातून तो देतोय त्याच्या स्वप्नांना आकार

Subscribe

मुंबईत स्वतःच्या शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यासाठी अपंग परमेश्वर सोनकांबळे या तरुणाची धडपड.

परमेश्वर सोनकांबळे हे जन्मजातच पायाने अपंग आहेत म्हणून ते इतरांसारखे हतबल होऊन शांत बसलेले नाहीत. उलट त्यांनी अपंगत्वावर मात करीत शिल्पकलेच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नांना नवा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. परमेश्वर यांनी साकारलेल्या शिल्पांना विविध संस्थाचे पुरस्कार मिळाले असून आज मुंबई शहरात आपल्या शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यासाठी त्यांची एकाकी धडपड सुरु आहे.

- Advertisement -

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटसाऱख्या दुष्काळी भागातील एक सर्वसामान्य गरीब कुटुंबात परमेश्वर यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने आईशिवाय त्यांना कोणाचाच मायेचा आधार मिळाला नाही. पाठीशी सात भाऊ, घरी कमालीचे दारिद्र्य, जमीन कसायची म्हटली तरी मालकीची गुंठाभरदेखील जमीन नव्हती. त्यामुळे दुसऱ्याच्या बांधावर जाऊन राबल्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय नव्हता. अशा कठीण परिस्थितीत परमेश्वर यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

परमेश्वर यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी कला क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेची पदवी घेतली. त्यानंतर दिल्ली येथील ललित कला अकादमीमधून त्यांनी शिल्पकलेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व त्याच संस्थेत काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. परंतु, कमी पगारामुळे नाईलाजाने ती नोकरी सोडून त्यांना मुंबईत परतावे लागले.
आज सोलापूरसारख्या दुष्काळी भागातून येऊन परमेश्वर यांनी शिल्पकलेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या या कलेच्या क्षेत्रात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच शिल्प साकारण्यासाठी लागणारे साहित्य हे अत्यंत महागडे असल्यामुळे त्यांना ते विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तसेच मुंबई सारख्या शहरात हक्काची जागा नसल्याने शिल्प साकारताना देखील मोठी अडचण होते.

- Advertisement -

परमेश्वर यांनी त्यावर उपाय म्हणून कर्ज मिळावे, म्हणून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाकडे अर्जदेखील केला होता. परंतु, त्यांच्याकडे स्वतःची जमीन नसल्याने त्यांना कर्ज नाकारण्यात आले. अनेक नेत्यांकडे, मंत्र्याकडे त्यांनी चकरा मारल्या. परंतु, सगळ्यांनी त्यांची उपेक्षा केली. तरीही परमेश्वर यांनी हिम्मत हारलेली नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. लहानपणापासूनच संघर्षाची सवय असल्याने या कठीण काळावर मात करु, असा विश्वास ते बोलून दाखवतात. परमेश्वर यांना मुंबईत स्वतःच्या शिल्पांचे प्रदर्शन भरवायचे तर आहेच. परंतु त्या सोबतच त्यांना ग्रामीण भागातील मुलांना शिल्पकलेचे धडे देऊन त्यांच्यात शिल्पकले विषयी गोडी निर्माण करायची आहे. त्याकरिता एखादी प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा त्यांची इच्छा आहे. सध्या शिल्पकलेच्या माध्यमातून परमेश्वर हे आपल्या स्वप्नांनाही आकार देण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -