रायगडसाठी विशेष पॅकेजची सरकारकडे मागणी करणार

शरद पवार यांचे आश्वासन

देशभरात आलेले करोनाचे संकट त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळाने घातलेले थैमान हे दुहेरी संकट असून रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे झालेले नुकसान तातडीने राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पोहोचवणार असून विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. ते श्रीवर्धन येथे नुकसानग्रस्त भागांच्या पाहणी दौर्‍यादरम्यान तहसीलदार कार्यालयात अधिकार्‍यांच्या बैठकीच्या वेळी बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी माणगाव, म्हसळा, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा केला. यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त नागरिकांजवळ थेट संवाद साधला तर समुद्रकिनारपट्टी लगतच्या मच्छिमार बांधवांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली. श्रीवर्धन येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा अधिकारी वर्गाकडून घेतला यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, महाड आमदार भारत गोगावले, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक डॉ अनिल पारसकर आदी यावेळी उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळाचे हे संकट रायगड, रत्नागिरी पुरते मर्यादित नसून महाराष्ट्रावर आलेले संकट असल्याने कोणतेही राजकारण न करता सर्वांनी मिळून या संकटाला तोंड देऊया, असे पवार म्हणाले.

वादळाच्या तडाख्याने कोकणातील मुख्य उपजीविकेचे साधन असणारी शेती, फळबागा यामध्ये नारळ, सुपारी, काजू व आंबा आदी व्यावसायिक त्याचप्रमाणे मत्स्यव्यवसाय करणार्‍या मच्छीमार बांधवांच्या नौका यांचे इंजिन खराब झाल्याने अतोनात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर वीज यंत्रणेचे झालेले नुकसान त्यामुळे छोटे व्यावसायिक संकटात आहेत. पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या सर्वांचा विचार करता राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार आहे, असे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पाणी आणि वीज या मूलभूत गरजा असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून दुरुस्ती करावी जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

वादळाच्या तडाख्याने जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा कोलमडली असल्याने बहुतांश गावे अंधारात आहेत. त्याचप्रमाणे वादळात घरातील छप्पर उडून घरातच साठवणूक केलेल्या अन्नधान्याची नासाडी झाली आहे. येत्या 2 दिवसात नुकसानग्रस्त सर्व कुटुंबाना केरोसीन, गहू, तांदूळ आणि डाळ मोफत देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

1) केंद्रातील ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे सर्कस असल्याची टीका केली होती. या टीकेला मिश्किल प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले की, आम्ही जर सर्कस असू तर आम्हाला सर्कशीमध्ये राजनाथ सिंह यांच्यासारख्या विदूषकाची गरज आहे.

2) नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार असल्याचे समजते, यावर पवार म्हणाले की, केंद्राचे पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि यावर केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी पवार यांनी आशा व्यक्त केली.