Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीच्या प्रतीक्षेत; उमेदवार चिंतेत

आरोग्य विभाग भरतीच्या प्रतीक्षेत; उमेदवार चिंतेत

Subscribe

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. वय वाढत चाललेल्या उमेदवारांमध्ये चिंता वाढत चालली आहे. जिल्हा परिषदेच्या पाच संवर्गातील एकूण १०,१२७ पदांसाठी ही भरती होणार आहे. ही पदे रिक्त असल्याने स्थानिक आरोग्य विभागावरचा ताणही वाढत आहे. मागील तीन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलली जात आहे. 

मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारने घोषणा करुनही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागावरचा ताण वाढत आहे. भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवारही चिंतेत आहेत.

शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये या भरतीची घोषणा केली होती. खास पत्रकार परिषद घेऊन या भरतीची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार १ ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. ८ ते २२ जानेवारी या काळात इच्छुकांचे अर्ज मागविले जाणार होते. अर्जाची छाननी व अन्य प्रक्रिया अपेक्षित होती. २५ व २६ मार्चला परीक्षा व २७ व २८ एप्रिलला निकाल, असे भरती परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक होते. नवीन वर्ष येऊन दहा दिवस झाले तरी यातील कोणतीच प्रक्रिया झालेली नाही.

- Advertisement -

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. वय वाढत चाललेल्या उमेदवारांमध्ये चिंता वाढत चालली आहे. जिल्हा परिषदेच्या पाच संवर्गातील एकूण १०,१२७ पदांसाठी ही भरती होणार आहे. ही पदे रिक्त असल्याने स्थानिक आरोग्य विभागावरचा ताणही वाढत आहे. मागील तीन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलली जात आहे.

गट क मधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,आरोग्य पर्यवेक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या पाच संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात २१ ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. याच शासन निर्णयामध्ये एक विशिष्ट वेळापत्रक देण्यात आले होते.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव यांनी यांसदर्भात ६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती. व्हिडिओ कॉन्फरेंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत अप्पर सचिवांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या भरतीविषयी सुचना दिल्या होत्या. सर्व जिल्हापरिषदेची जाहिरात एकाच दिवशी प्रसिद्ध करावी. आचारसंहिता व अन्य बाबींचा विचार करुन वेळापत्रक ठरवावे. महसुल विभागाने या प्रक्रियेसाठी एका कंपनीची निवड करावी. त्याचा अपेक्षित खर्च व एकसमान शुल्क निश्चित करावे, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यांनतर पुढे काहीच झाले नाही.

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -