घरमहाराष्ट्रकोरोनात दिलासा...आणि टेन्शनही !

कोरोनात दिलासा…आणि टेन्शनही !

Subscribe

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात एकटेच ठेवण्यात येत असे. मात्र, आता हा रुग्ण रुग्णालयात एकटा राहणार नसून त्याच्यासोबत एका नातेवाईकाला राहण्याची मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी केली.

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांना सतर्क करण्यात आले आहे. कोरोना रुग्णवाढ ही झपाट्याने होत आहे. त्यामुळे पूर्वतयारीसह या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये व्यवस्था कशाप्रकारे आहेत, याचा आढावा देशमुख यांनी घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ज्या आवश्यकता भासतील याची या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णाबरोबरच केवळ एकच नातेवाईकाला बरोबर राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

त्याचबरोबर कोरोनाची गंभीर लक्षणे असणार्‍या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी तसेच रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. कोविडचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने व्हेंटिलेटर्स, सीटी स्कॅन मशीन, एमआरआय मशिन्स, ऑक्सिजन मशिन्स सर्व सुस्थितीत आहेत किंवा नाही याची सुद्धा चाचपणी तातडीने करून घ्यावी, अशा सूचनाही अमित देशमुख यांनी बैठकीत दिल्या.

मुंबईमध्ये लॉकडाऊन अटळ

कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या घरात पोहोचल्यावर मुंबईत लॉकडाऊन करावे लागेल असे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले होते. हे वक्तव्य करून दोन दिवस उलटले नाही तोच मुंबईतील कोरोना रुग्णांनी गुरुवारी 20 हजार 181 चा आकडा गाठला. त्यामुळे मुंबईमध्ये लॉकडाऊन अटळ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी 7 ते 8 हजारांच्या घरात असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने बुधवारी थेट 18 हजारांचा तर गुरुवारी 20 हजारांचा टप्पा गाठला. मुंबईत सापडलेल्या कोरोना रुग्णांपैकी 17 हजार 154 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, तर 1170 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कोरोनामुळे मुंबईमध्ये गुरुवारी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील झपाट्याने वाढती रुग्णसंख्या पाहता आणि 20 हजारांचा ओलांडलेला टप्पा यामुळे मुंबईत लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईप्रमाणे राज्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. राज्यात ३६,२६५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, बाधितांची संख्या ६७,९३,२९७ वर पोहोचली आहे. राज्यात गुरुवारी 13 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर २.०८ टक्के एवढा झाला आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण फारच अल्प आहे. राज्यात गुरुवारी ८,९०७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के एवढे झाले आहे. कोरोनाबरोबरच राज्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात गुरुवारी ७९ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबई ५७, ठाणे मनपा ७, नागपूर ६, पुणे मनपा ५, पुणे ग्रामीण ३, पिंपरी चिंचवड १ यांचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ८७६ इतकी झाली असून यातील 381 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -