बूस्टर डोस मोफत करून केंद्राने खर्च उचलावा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विमानासह रेल्वे प्रवासातही मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटकसह राज्यातही कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जर कोरोना रूग्णांची संख्या वाढत राहिली तर पुन्हा एकदा निर्बंध लागतील, अशी स्थिती आहे. परंतु राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) हे सत्त राज्यातील जनतेला आवाहन करताना दिसत आहेत. मात्र, बूस्टर डोस मोफत करून केंद्राने खर्च उचलावा, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत राजेश टोपेंची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत करावा आणि त्याचा खर्च केंद्राने उचलावा, अशा प्रकारची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, खासगी रूग्णालयातील मर्यादित क्षमता पाहता बूस्टर डोस उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्याचा उपयोग चांगला होईल. सध्या बूस्टर डोसची किंमत पाहिली असता ३८० रूपये इतकी आहे. तसेच बुस्टर डोसची किंमत जास्त असल्यामुळे नागरिकांमधून विचारणा होते, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत करून त्याचा संपूर्ण खर्च केंद्राने उचलावा, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

आशा वर्करांनी लसीकरण मोहीम सक्षमपणे पुढे नेली आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम राबवणाऱ्या आशा वर्करला केंद्राकडून दोन हजार रूपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी देखील राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती काय?

राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज राज्यात १ हजार ८८५ रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत आज १ हजार ११८ रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा : मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; १११८ नवे रुग्ण, तर राज्याची रुग्णसंख्या १८८५ वर