..तर ३ दिवसांत महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडेल – आरोग्यमंत्री

Health Minister Rajesh Tope says corona vaccination in Maharashtra will be stopped in 3 days
..तर ३ दिवसांत महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसांला ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सध्या जास्तीत जास्त कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला आहे. कारण कोरोनाला रोखायचे असेल तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. पण अशा परिस्थिती राज्यात कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. सध्या राज्याकडे १४ लाख लस उपलब्ध असून या फक्त तीन दिवसांसाठी पुरतील एवढ्या आहेत. त्यामुळे जर केंद्राने महाराष्ट्राला लवकरात लवकर लस पुरवठा केला नाही तर तीन दिवसांत लसीकरण बंद पडेल, अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेच्या सुरुवात राजेश टोपे यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या महाराष्ट्राच्या जनतेला निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी काल देशातील नऊ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत व्हीसीद्वारे चर्चा झाल्याचे सांगितले. यावेळेस महाराष्ट्रातील लस पुरवठा, ऑक्सीजनचा पुरवठा आणि रेमडेसिवीर चर्चा करण्यात आली. रोज सहा लाख लसीकरण करण्याचे केंद्राचे आव्हान पूर्ण करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. पण आता राज्याकडे फक्त १४ लाख लसीचा साठा आहे. पाच लाखांच्या दृष्टीकोनातून हा साठा फक्त तीन दिवसांपुरताच आहे. सध्या केंद्रावर लोकं येतायत आणि त्यांना लस आली नाही आहे, तू घरी जा, अशी सांगण्याची वेळ राज्यावर आली आहे. त्यामुळे केंद्राने लस पुरवठ्याचे काम वेगाने करा, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे.

देशभरात महाराष्ट्र लसीकरणात अव्वल स्थानावर आहे. पण आता महाराष्ट्राकडे लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्राने इथे जास्त लक्ष्य दिले पाहिजे. लसीचे डोस नसल्यामुळे राज्यातील काही ठिकाणी लसीकरण थांबवले गेले आहे. त्यामुळे केंद्राकडून ज्याप्रमाणे आव्हानात्मक बोलले जाते, त्याप्रमाणे केले जात नाही. पण आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहता केंद्राने आठवड्याला किमान ४० लाख लसींचा पुरवठा करावा. जेणेकरून दररोज सहा लाख लोकांना लस देण्याचे धैर्य पूर्ण करता येईल, असे टोपे म्हणाले.


हेही वाचा – किमान ४५ वयोगटासाठी पुरेल इतका तरी लस पुरवठा करा, महापौरांचाही केंद्राला चिमटा