घरताज्या घडामोडीDelta Plus Variant: राज्यातील २१ पैकी २० रुग्णांची डेल्टा प्लसवर मात -...

Delta Plus Variant: राज्यातील २१ पैकी २० रुग्णांची डेल्टा प्लसवर मात – राजेश टोपे

Subscribe

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आणि मग पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण काही दिवसांनंतर कोरोनाची दुसरी लाट मंदावली आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली गेली. पण आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच डेल्टा प्लस व्हेरियंटचे सावट आहे. पण राजेश टोपे यांनी डेल्टा प्लस व्हेरियंटसंदर्भात चिंता करण्याची गरज नाही, असे सांगितले आहे. राजेश टोपे म्हणाले, राज्यात २१ लोकं डेल्टा प्लस व्हेरियंट बाधित आढळले. त्यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर उर्वरित लोकं बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सज्ज झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मंत्र सांगितला आहे; तो म्हणजे वॅक्सीन, वॅक्सीन आणि वॅक्सीन. याच मंत्राने राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नियंत्रणात आणता येऊ शकते किंवा त्याची दाहकता कमी करता येऊ शकते, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या १ लाख १४ हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. आतापर्यंत राज्यात ३ कोटी १७ लाख ८२ हजारांहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे. पण आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाबाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी ७० टक्के लसीकरण झाले पाहिजे, असे राजेश टोपे म्हणाले.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टोपेंचे लोकांना आवाहन

राज्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या जास्त असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी लोकं बेफिकिरपणा करताना दिसत आहे आणि हेच योग्य नाही आहे. म्हणून लोकांनी लसीकरणाला अग्रक्रम द्यावाच लागेल. तसेच आरटीपीसीआरची दररोजची क्षमता पावणे दोन लाख, दोन लाखांपर्यंत आहे. दररोज एवढ्या चाचण्या झाल्याच पाहिजे. चाचण्याच्या प्रमाणात अजिबात कमी करू नये, अशा आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. चाचणी कमी केल्याने दररोजच्या पॉझिटिव्ह संख्यांवर परिणाम होतो. त्यामुळे चाचणी करण्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन टोपे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.

- Advertisement -

राज्यातील डेल्टा प्लसची परिस्थिती…

राज्यातील डेल्टा प्लसबाबत राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात डेल्टा प्लस संदर्भात दर महिन्याला १०० नमुने घेतले जात आहेत. तर प्रत्येक आठवड्यात २५ नमुने घेतले जात आहे. अशा पद्धतीने प्रति महिना डेल्टा प्लस नमुन्यांची जिनोम सिक्वेसिंग केली जातेय. राज्यातील ४ हजार लोकांच्या नमुन्यांची जिनोम सिक्वेसिंग झाली आहे. यापैकी २१ लोकं डेल्टा प्लस व्हेरियंट बाधित आढळले. त्यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर उर्वरित लोकं बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -