ख्रिसमस आणि नवीन वर्ष धूमधडाक्यात साजरे करा, पण… आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

Tanaji Sawant
तानाजी सावंत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. चीन, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशभरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे भारतानेही चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातून कोरोना कधीच गेला आहे. ख्रीसमस आणि नवीन वर्ष धूमधडाक्यात साजरे करा, असं तानाजी सावंत म्हणाले.

तानाजी सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोरोना महाराष्ट्रातून आऊट झाला आहे. ख्रीसमस आणि नवीन वर्ष धूमधडाक्यात साजरे करा. मात्र येत्या 27 तारखेला कोरोनाची जुनी यंत्रणा होती त्याची मॉकड्रिल होणार आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही काही उपाययोजना करणार असल्याचे तानाजी सावंत म्हणाले.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांकडून एक पत्र राज्यांना पाठवण्यात आलं आहे. आगामी काळात कोणती खबरदारी घेण्यात यावी? याबाबत सर्व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. येत्या काळात राज्यात अनेक सणोत्सव आहेत. या काळात कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्यात यावी, असं या पत्रात म्हटलं आहे.

ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं आढळतील त्याची तातडीने चाचणी करण्यात यावी. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. तसेच नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. आवश्यक ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर ठेवावे, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना या पत्राद्वारे राज्यांना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : पुण्यात चितेजवळ तृत्तीयपंथींचा ‘रात्रीस खेळ चाले’