घरताज्या घडामोडीरुग्ण वाढले, पण अजून तिसरी स्टेज नाही; फक्त काळजी घेणं गरजेचं -...

रुग्ण वाढले, पण अजून तिसरी स्टेज नाही; फक्त काळजी घेणं गरजेचं – आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

Subscribe

करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली जरी असली, तरी ती कम्युनिटी स्प्रेडमुळे नाही. त्यामुळ घाबरून जाऊ नका, पण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे, असं आवाहन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७४ वरून ८९ पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये मुंबईत १४ रुग्ण तर पुण्यात १ रुग्ण वाढला आहे. या वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे आता मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या २४ वरून ३८ झाली आहे. मात्र, तरीदेखील मुंबईत मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडल्याचं चित्र सोमवारी सकाळी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली. तसेच, जमावबंदीचे सरकारी आदेश पाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा त्यांनी केलं आहे. त्यासोबतच, इथून पुढे प्रत्यक्ष पत्रकार परिषद न घेता फेसबुकवरूनच माहिती देण्याचा प्रयत्न करण्याचं देखील त्यांनी सांगितलं.

‘वाढलेले रुग्ण कम्युनिटी स्प्रेडमुळे नाहीत’

‘१५ करोनाग्रस्त आज वाढले असून एकूण ८९ वर आकडा गेलाय. १४ लोक मुंबईत तर १ पुण्यात वाढलाय. त्यातल्या ८ लोकांना कॉन्टॅक्टचा इतिहास आहे. पण हे कम्युनिटी स्प्रेड नाही. रुग्णाच्या घरातले कॉन्टॅक्टमधले लोक असल्यामुळे त्यांना लागण झाली आहे. त्याशिवाय ६ लोकं परदेशातून आलेले आहेत. त्यामुळे हा कम्युनिटी स्प्रेड नाही’, असं यावेळी राजेश टोपेंनी ठामपणे सांगितलं.

- Advertisement -

‘…तर पोलीस कारवाईशिवाय पर्याय नाही’

‘आज सकाळपासून मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यासाठी मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. त्यांना विनंती केली आहे. १४४ लागू आहे. त्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करू नये. जनतेलाही विनंती आहे की गर्दी करू नका, नाहीतर पोलीस कारवाईशिवाय पर्याय राहणार नाही. केमिस्ट, डॉक्टर देखील निघाले असू शकतील. त्यांची थोडीफार गर्दी होणं साहजिक आहे. पण इतरांनी गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करणं हीच आजची गरज आहे. लहान मुलं आणि वृद्धांची सुरक्षा ही पहिली जबाबदारी आहे. जे आजारी आहेत, डायबिटीज, हायपर टेन्शन, ह्रदयाचे आजार ज्यांना आहेत, त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्यांची प्रतिकार क्षमता कमी झालेली असते’, असं टोपेंनी यावेळी सांगितलं.

‘इथून पुढे फेसबुकवरच बोलुयात’

‘मीच आहे माझा रक्षक या टॅगलाईनप्रमाणे वागणं महत्त्वाचं आहे. काहीही झालं, तरी मी घरी राहून करोनाला हरवेन अशा पद्धतीनेच काम करणं आवश्यक आहे. माध्यमांच्या बाजूने देखील असं व्हायला हवं. मी स्वत: माझ्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून बोलेन. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मला थेट विचारत जा. मी उत्तरं देत जाईन’, असंदेखील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


वाचा सविस्तर : महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ८९वर! मुंबईत आणखीन एकाचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -