राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर सुनावणी पूर्ण, ‘या’ दिवशी येणार निर्णय

Doctors advise Raj Thackeray to rest

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात शिराळा न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. यानंतर ईस्लामपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राज ठाकरेंच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करून त्यांना जामीन मंजूर करावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.

राज ठाकरेंच्या वकीलांचा युक्तीवाद-

राज ठाकरेंच्या बाजून अॅड विजय खरात, अॅड धीश कदम, अॅड. आनंद चव्हान यांनी युक्तीवाद केला. आंदोलनात राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. त्यामुळे या खटल्यातून त्यांचे वगळण्यात यावे, सध्या ते कोरोनाग्रस्त असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. त्यामुळे ते सुनावणीस हजर राहू शकत नाहीत. तसेच राज्य सरकारनेही जनहितासाठी झालेल्या आंदोलनाचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे अटक वॉरंट रद्द करून राज ठाकरे यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद –

सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करताना अॅड रणजीत पाटील यांनी हे प्रकरण खूप जुने असून निकाली निघणे गरजेचे आहे. राज ठाकरे सुनावणीला हजर राहत नसल्याने ते लांबत चालले आहे. राज ठाकेर हजर राहिल्याशिवाय हे कामकाज पुढे सरकणार नाही.त्यांना काढलेले वॉरंट योग्यच आहे, असा युक्तीवा केला.

काय आहे प्रकरण –

शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल न्यायदंडाधिकाऱ्यांनी 28 एप्रिलला राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. राज ठाकरे यांच्यासह सांगली मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि शिरीष पारकर यांच्यासह 10 जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच 28 जानेवारी, 25 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 28 एप्रिल 2022 या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द केला गेला आहे.