गरबा खेळताय सावधान! चार दिवसांत सहा जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई – सगळीकडे नवरात्रौत्सावाचा जल्लोष सुरू असताना गेल्या चार दिवसांत देशभरात सहा जणांचा गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये राज्यातील चारजण असून यापैकी मुंबईतील दोघांचा समावेश आहे. मुलुंडमध्ये १ ऑक्टोबरच्या रात्री ऋषभ लहरी याचा मृत्यू झाला. गरबा खेळत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

३० सप्टेंबर रोजी वाशिममधील कारंजा गावात दोघांचा मृत्यू झाला. गोपाळ इन्नानी यांना गरबा खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. २५ वर्षीय सुशील काळे याचाही गरबा खेळताना मृत्यू झाला. तर, बुलडाण्यातही एकाचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यातील हॉटेल व्यावसायिक विशाल पडधरीया (४७) दांडिया खेळत असताना चक्कर येऊन पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शनिवारी २९ सप्टेंबर रोजी विरार येथील ग्लोबल सिटीमधील एव्हरशाईन अॅव्हेन्यू येथे राहणारा ३५ वर्षीय मनीषकुमार जैन गरबा खेळत होता. गरबा खेळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करत असताना रिक्षामध्येच त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याचे वडील नरपत जैन यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनीषचा महिन्याभरापूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे, एकाच दिवसात एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

गुजरातमध्येही अशीच घटना घडली आहे. गुजरातमधील आनंद परिसरातील तारापूर येथे २१ वर्षाच्या युवक गरबा खेळत होता. मात्र, खेळता खेळता तो अचानक बेशुद्ध पडला. उपचारांसाठी रुग्णालयात जात असतानाच मृत्यूने त्याला गाठले.

ताणतणांमुळे हृदयविकाराचे झटके

तणाव हे तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण आहे. स्पर्धा, जास्त काम, दबाव इत्यादी गोष्टींमुळे तरुणांमध्ये ताण येतो. कॉर्पोरेट संस्कृतीत काम करणाऱ्या तरुणांना व्यायामासाठी वेळ नसतो हे बर्‍याचदा पाहायला मिळतं. वेळेआधीच ऑफिस गाठायची घाई असल्याने बर्‍याचदा तरुणांना घरचे जेवण खायला मिळत नाही. बाहेरील खाद्यपदार्थात मीठ आणि तेल जास्त असते, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. याशिवाय जास्त प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगमुळे उच्च रक्तदाबची प्रकरणे देखील वाढत आहेत. त्यामुळे सर्व ताणतणावापासून दूर राहून आत्मसंयम जीवन जगणे महत्त्वाचे आहे. तसेच चांगला आणि संतुलित आहार घेणे व नियमित व्यायाम किंवा योग करणे महत्त्वाचे आहे, असं कार्डिओ थोरॅसिक आणि रक्तवाहिन्यासंबंधी शल्यचिकित्सक डॉ. बिजॉय कुट्टी म्हणाले.

व्यायाम, खेळाची सवय नसल्यास हृदयाला त्रास होणार

आजच्या तरुण तरुणींना सहसा मैदानी खेळ खेळण्याची व व्यायामाची सवय नसते, अनेकांच्या शरीराला तर साधा चालण्याचा व्यायाम सुद्धा होत नाही. मग अचानक नऊ दिवसांत गरबा खेळायला गेलं की शरीराला त्रास होणारच. गरब्याचा नाच हा मैदानी खेळासारखाच प्रकार आहे, ज्यामध्ये शरीराला चांगलाच व्यायाम घडतो. एरवी व्यायामाची, खेळाची व घाम गाळण्याची सवय नसलेल्या शरीराला, विशेषतः हृदयाला ते झेपत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे हार्ट अटॅक. त्यात आजकाल आपला आहार शरीराला नाही तर जिभेला पूरक असतो. शरीराला अत्यावश्यक प्रथिनांची कमी आणि साखर, मैदा अशा सुपाच्य कर्बोदकांचा (refined carbohydrates) मात्र अतिरेक, ज्यामुळे बहुतांश तरुण तरुणींची शरीरे आकाराने व वजनाने जास्त असतात आणि या स्थूल शरीर व मोठे पोट असणाऱ्यांना मुळातच हार्ट अटॅक चा धोका जास्त असतो, जो गरब्या सारखा थकवणारा व्यायाम केल्यावर प्रत्यक्षात घातक सिद्ध होतो, असं आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अश्विन सावंत म्हणाले.