मुंबईः भारतीय हवामान विभागाने राज्यात 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार मुंबई-ठाण्यासह, पालघर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसामुळे थोडा काळ उकाड्यापासून सुटका झाली असली, तरी पुन्हा अंगाची लाहीलाही करणार्या उष्णतेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
9 मार्च रोजी सामान्य कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तर मुंबई-ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर्षी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरला. उर्वरित तीन महिनेदेखील असेच तापदायक राहतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काय काळजी घ्यावी
दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे.
कडक उन्हात डोके झाकून घ्यावे.
शक्यतो सुती व सैल कपडे परिधान करावे.
तहान लागल्यास पाणी, लिंबाचा सरबत, ताक इत्यादी थंड पेय प्यावे.
डोके दुखी, चक्कर, अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जावे.