विदर्भात ३१ मे पर्यंत हिट वेव्हचा रेड अलर्ट

विदर्भातील अकोला, नागपुर, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये या हिटवेव्हचा परिणाम जाणवत आहे.

हवामान विभागामार्फत महाराष्ट्रात संपुर्ण विदर्भासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये हिट वेव्हचा परिणाम असणार आहे असाही उल्लेख करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, नागपुर, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये या हिटवेव्हचा परिणाम जाणवत आहे. २५ मे रोजी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ही अकोला येथे ४७.४ डिग्री सेल्सिअस इतकी झाली होती. याठिकाणी सरासरीपेक्षा ५.५ डिग्री सेल्सिअस इतके तापमान अधिक होते. तर आज अकोल्यात ४६.५ डिग्री सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यापेक्षा आज नागपुरमध्ये सर्वाधित तापमानाची नोंद ४६.८ डिग्री सेल्सिअस इतकी झाली आहे. तर देशात राजस्थानातील चुरू येथे ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद २५ मे रोजी झाली होती. येत्या ३१ मे पर्यंत विदर्भात हिट वेव्हचा रेड अलर्ट जारी राहील, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुजरात आणि राजस्थानातून उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे हा प्रभाव विदर्भात राहणार आहे. तर काही भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यताही आहे. काही भागात सातत्याने तापमानात वाढ राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागामार्फत विदर्भातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, वाशीम, गडचिरोली, ब्रम्हपुरी या जिल्ह्यांना यलो एलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये जळगाव, अहमदनगर, नाशिक आणि सोलापूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हिटवेव्हचा परिणाम राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोकण भागात मुंबईसह सरासरी तापमानाची नोंद झाली आहे.