Pre Monsoon Rain : राज्यातील काही भागात मान्सून दाखल, बळीराजाला मोठा फटका

मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत. अशातच राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बळीराजाला मात्र मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्षे, आंबे आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. पंढरपूर परिसरात वादळी वारे आणि पावसाने द्राक्षे, बेदाणे शेड उध्वस्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. तर शेवग्याची झाडे देखील पडली आहेत.

ऐन द्राक्ष काढणी हंगामात वादळी वारे आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. पटवर्धन कुरोली येथे जवळपास ५० एकर वरील केळीच्या बागा आडव्या झाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. अहमदनगर शहरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होताच विद्युत पुरवठा खंडित झाला. विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, वाशिमच्या काही भागात मान्सून पूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने काही प्रमाणात तापमानाचा पारा घसरला होता. सांगली आणि वर्धा शहरांतील काही भागात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली.

कोकण किनारपट्टीवर देखील पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. इंदापूर शहरासह तालुक्यात दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात १९ ते २१ मे दरम्यान विजांच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.