नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी (दि. ७) पासून पुन्हा सक्रिय होत पहाटेपासून शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली. यामुळे बळीराजामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नद्या-नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. खरिपातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यातील सटाणा, कळवण, निफाड, पेठ, सुरगाणा, वणी, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी भरल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.
नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग वाढवला
शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारी (दि. ७) पासून जोरदार हजेरी लावल्याने अनेक सर्वच नद्या-नाले दुथडी भरून ओसंडत आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून शुक्रवारी (दि. 8) दुपारी 12 वाजता 100 क्युसेक्सने विसर्ग सरू होता. तो आता 200 क्युसेक्सने वाढवण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून एकूण 300 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून आज दुपारी ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, अशीही माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
वाघाड धरण ओव्हरफ्लोच्या दिशेने
वाघाड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून सततच्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीतवाढ होत असून दुपारी १ वाजता धरणाचा पाणीसाठा ९० टक्के झालेला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वाघाड धरण मध्यरात्रीपर्यंत पूर्ण भरून धरणातून कोळवण नदीपात्रात विसर्ग सुरू होईल. तरी दिंडोरी तालुक्यातील कोलवण नदीकाठच्या दोन्ही तीरावरील लोकांनी सतर्कता बाळगावी म्हणून संबंधित गावांना सावधनतेचा इशारा देण्यासंबंधी संबंधित यंत्रणेने खबरदारी घ्वावी, असे आवाहन वाघाड कालवा उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ हे पालखेड पाटबंधारे विभागाच्या वतीने करत खबरदारीचा इशारा देण्यात आला.
मांजरपाडा प्रकल्प खळखळला
पाणलोट क्षेत्र व मांजरपाडा प्रकल्प येथील भागात पडलेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे मांजरपाडा प्रकल्पातील पाणी पुणेगाव धरणात वेगाने प्रवाहीत होत असल्याने पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात मांजरपाडा प्रकल्प देवसाने परिसरात पडलेल्या मोठ्या पावसामुळे हे पाणी पुणेगाव धरणात प्रवाहीत होत असल्याने पुणेगाव धरणाचा जलसाठा कमालीचा वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी ओझरखेड धरणात प्रवाहीत होत असल्याने ओझरखेड धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
देवनदीला पूर
वणी व परिसर तसेच सप्तशृंग गडावरील पर्वत रांगांमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे वणीच्या देवनदीला पूर आला असून ओझरखेड धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. भातोडा देवनदी येथून पाण्याचा प्रवाह वणीच्या देवनदीत प्रवाहीत होतो व हे पाणी ओझरखेड धरणात जाते. यामुळे ओझरखेड धरणातील जलस्तरात वाढ झाली आहे. तसेच नद्या, नाले दुथडी भरभरुन वाहु लागली असून. शेतकरी वर्गाच्या आर्त सादेला वरुणराजाने प्रतिसाद दिल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तीन दिवसांच्या संततधारेमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
कोलथीनदी खळाळली
गेल्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बागलाण तालुक्यात दोन दिवसांपासून पश्चिम भागात सुरु झालेल्या पाऊसामुळे कोलथी नदीचा उगमस्थान प्रवाहित झाल्याने बळीराजासह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, अजून दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. कोलथी नदीचे उगमस्थान शुक्रवारी (दि. ८) प्रवाहित झाल्याने ते पाणी थेट खर्डे परिसराला लाभदायक ठरणार्या वार्शी धरणात पडल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार असल्याने विशेष करून महिला वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खर्डे व परिसरात झालेल्या पावसामुळे आहे त्या पिकांना तूर्त जीवदान मिळाले असून, बळीराजा अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
कळवण तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कळवण तालुक्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून गिरणा, पुनद, बेहडी नद्यांना आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळा सुरु होऊनही पावसाने ३ महिने दडी मारल्याने शेतकर्यांसह सर्वच जण चिंतेत असताना बुधवारी (दि. ६) रात्रीपासून पावसाने कळवण तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. कळवण-नाशिक रस्त्यावरील आठंबे येथील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक अभोणा मार्गे वळविण्यात आली.
त्र्यंबकेश्वरच्या पिकांना जीवदान
त्र्यंबकेश्वर तालुक्यात तसेच माहेरघरी अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पूर्वा नक्षत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला आहे. माळरानावरील पावसाअभावी माना टाकलेल्या पिकांना मात्र जीवदान मिळाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुरुवारी (दि. ७) मंडळनिहाय एकूण २५८.०२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने धो धो बरसण्यास सुरुवात केल्याने पुन्हा एकदा नदी-नाले खळाळून वाहू लागले आहेत. अवणी केलेल्या भाताच्या अवणाच्या खाच खळग्यातून जोरदार पाणी वाहू लागले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुरुवारी (दि.७) रोजी त्र्यंबक ३२ मिमी, वेळुंजे १०३ मिमी, तर हरसूल १२३.०२ मिमी पावसाची एकूण २५८.०२ नोंद करण्यात आली आहे. यावेळी हरसूल शहरासह परिसरातील बत्तीगुल झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. नेहमीच पावसामुळे हरसूल येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या माध्यमातून अडथळा निर्माण होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात येतो. शुक्रवारी दुपारपर्यंत मात्र हरसूल शहरासह वीज पुरवठा सुरळीत करण्यात कुठलेही यश आलेले नव्हते.