आजपासून तीन दिवस धोक्याचे, अतिवृष्टीचा इशारा; गरज असेल तरच घराबाहेर पडा!

कोकणासह, मध्य महाराष्ट्र, पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा हा जोर १२ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने उघडीप घेतली असली तरीही राज्यात पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा (Heavy rain expected) दिला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा हा जोर १२ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले आहे. (Heavy rain for the next three days in maharashtra)

हेही वाचा – नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, प्रविण दरेकरांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

यंदा पावसाने महाराष्ट्रात उशिराने एन्ट्री घेतली. संपूर्ण जून महिना कोरडा गेला. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तुफान बॅटिंग केली. दरम्यान, कालपासून पावसाने थोडी उघडीप घेतली आहे. मात्र, यामुळे नागरिकांनी निर्धास्त न होता अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण, पुढील तीन दिवस राज्यात मेघराज गर्जणार आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने ढग मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या एक तारखेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोकणात तर नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून चिपणळूणच्या वशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे.

हेही वाचा – अमरनाथ गुंफेजवळ ढगफुटी, 15 यात्रेकरुंचा मृत्यू, अनेक जखमी, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

गेल्या काही दिवसांपासून  राज्यात मुसळधार कोसळत असल्याने अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडल्याने नद्यांच्याही पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आली असून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रविण दरेकरांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

दरम्यान, रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यांसदर्भात आज निवेदन दिले आहे. तसेच आपत्तीच्या काळात त्या भागांमध्ये संरक्षक भिंती व निवारा केंद्र उपलब्ध करुन देण्याची विनंतीही दरेकर यांनी यावेळी केली. नैसर्गिक आपत्तीसाठी आवश्यक असलेले बचाव साहित्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले.