घरमहाराष्ट्रपावसाचे धुमशान !

पावसाचे धुमशान !

Subscribe

मुंबईकर पाण्यातच क्वारंटाईन, पुढचे तीन दिवसही पावसाचे, २ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू,ठाणे, पालघर,रायगडात येत्या 24 तासांत अतिवृष्टी, कोकणात मुसळधार सुरूच , नाशिककर मात्र कोरडेच

=मुंबईत २४ तासांमध्ये २८६ मिमी पावसाची नोंद
=सप्टेंबर महिन्यातला १९७४ नंतरचा सर्वाधिक पाऊस
=मुंबईत पावसाचे २ बळी
=सर्वाधिक पाऊस बीकेसीत ३६६ मिमी
=सर्वात कमी पाऊस कुलाबा १४७ मिमी
=मुंबईसाठीचा यलो अलर्ट खरा ठरला
=मुंबई महापालिकेचे नायर कोव्हिड हॉस्पिटल पाण्यात
=१ जून ते २३ सप्टेंबर मान्सून कुलाबा वेधशाळा -३५७१ मिमी सांताक्रुझ -३१४७ मिमी पाऊस
=नवी मुंबईत दिवाळे गावात पाऊस ३०४ मिमी

मुंबईचे जनजीवन विस्कळीत करत पावसाने हाहा:कार उडवत स्वतःचाच गेल्या 26 वर्षांतला सप्टेंबर महिन्यातील विक्रम मोडला आहे. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईसह परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबई शहर, उपनगरे आणि नवी मुंबई परिसरालाही त्याचा मोठा फटका बसला. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या रौद्ररूपाचा परिणाम हा रस्ते वाहतूक तसेच लोकलच्या वाहतुकीवरही झाला. येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टीचा अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून कायम ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच असून अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. उत्तरा महाराष्ट्रात नाशिक मात्र पावसाअभावी कोरडेच होते. दक्षिण मुंबईच्या आग्रीपाड्यात इमारतीच्या बेसमेंटमधील पाणी काढताना लिफ्टचा वापर केल्याने दोन सुरक्षा रक्षकांचा गुदमरून मृत्यू झाला.

- Advertisement -

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने मुंबईसह परिसराला यलो अलर्ट घोषित केला होता. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतील परळ, वरळी, यासारख्या भागात सकाळीच पाणी साचायला सुरुवात झाली. पावसाचा फटका बसल्याने मुंबई उपनगरीय लोकलची सेवादेखील विस्कळीत झाली. मुंबईसह ठाणे, रायगड परिसरासाठीही यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. तर पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या विक्रमी पावसामुळेच मुंबई महापालिकेनेही बुधवारी निमशासकीय, शासकीय आणि खाजगी कार्यालयांसाठी सुट्टी जाहीर केली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच कामावर बोलावण्यात आले. मुंबईत दुपारच्या सुमारास पावसाचा जोर थोड्या वेळासाठी ओसरला खरा; पण दुपारनंतर मात्र पावसाने ब्रेक घेऊन जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली. मुंबईतल्या पावसामुळे भेंडी बाजार, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, हिंदमाता, काळाचौकी, वरळी सीफेस यासारख्या भागात पाणी साचले होते.

पश्चिम उपनगराला पावसाने झोडपले
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये कुठे किती पाऊस झाला याबाबतची आकडेवारी प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबामार्फत जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा बीकेसीत झाला आहे. त्यापाठोपाठ धारावीत सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या मध्यवर्ती भागातच वाहतुकीची प्रचंड कोडी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची सर्वाधिक नोंद झाल्याचे पहायला मिळाले.पश्चिम उपनगराला पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे. मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद ही बीकेसीत म्हणजे 366.4 मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ धारावीत 360 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे 286.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालाडला 257.2 मिमी पाऊस तर बोरिवलीत 204.4 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडला. दक्षिण मुंबईकुलाबा येथे 147 मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात भांडूप येथे 185 मिमी आणि चेंबूर येथे 209 मिमी पावसाची नोंद झाली.

- Advertisement -

तिन्ही मार्गावरील लोकल ठप्प, बेस्टचे 100 मार्ग वळवले
मध्य रेल्वेने विशेष लोकलच्या फेर्‍या चालवताना ठाणे- कसारा, ठाणे- कर्जत, ठाणे- वाशी दरम्यान लोकल सेवा सुरू ठेवण्याची घोषणा केली. मात्र, लोकल 8.15 नंतर पुढे चालविणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि वांद्रे दरम्यानच्या लोकल सुरुवातीला ठप्प झाल्या. त्यानंतर वांद्रे ते डहाणूपर्यंतच्या लोकल बंद करत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मात्र सुधारीत वेळापत्रक जाहीर करत असल्याचे सांगितले. मुंबईच्या वाहतुकीची दारोदारी असलेली बेस्ट वाहतूक उपक्रमाची सेवाही ठिकठिकाणी पाणी साचल्याने विस्कळीत झाली. त्यामुळे बेस्टला 100 फेर्‍यांचे मार्ग वळवावे लागले. तर काही बसेसचे मार्ग पाणी साचलेल्या भागातच थांबवण्याची वेळ आली.

नवी मुंबईलाही तडाखा
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने कहर केलाच; पण नवी मुंबईतही पावसाने आज थैमान घातले. नवी मुंबईतही दिवाळे गावात सर्वाधिक 304 मिमी इतका पाऊस झाला. तर सीबीडी बेलापूरलाही पावसाचा मोठा फटका बसत अनेक ठिकाणी पाणी साचले. सीबीडी बेलापूरला 279 मिमी पावसाची नोंद झाली. तर सानपाड्यात 185 मिमी पाऊस आणि घणसोली येथे 136 मिमी पावसाची नोंद झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -