घरमहाराष्ट्रपालघरमध्ये मुसळधार पाऊस

पालघरमध्ये मुसळधार पाऊस

Subscribe

आठही तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत, पालघर शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली,  एनडीआरएफची टीम पालघरमध्ये दाखल,  पालघर शहरात 460.6 मीमी पावसाची नोंद

पालघर तालुक्यासह डहाणू, जव्हार, विक्रमगड, वसई, वाडा या तालुक्यांमध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानेे हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणच्या रहिवासी भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळवे परिसराला पाण्याने वेढा दिल्याने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. पावसाचे रौद्ररुप पाहता एनडीआरएफची एक टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे.

या पावसामुळे पालघर शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. मध्यरात्रीतून झालेल्या या मुसळधार पावसामुळे पालघर शहरात 460.6 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पालघर मनोर, पालघर बोईसर रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

- Advertisement -

वाडा तालुक्यातील अनेक गावांतील रस्ते नदी नाल्यांच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. डोंगराच्या उतारावरून येणार्‍या पाण्यामुळे शेतातही पाणी साचले आहे. बोईसर परिसरालाही पावसाने जोरदार तडाका दिला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर, भीमनगर, रूपरजतनगर, सिडको कॉलनी, टाइप 1, 2, 3 आणि 4, धोडीपूजा, अवधनगर इत्यादी सखल भागामधील तळमजल्यावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी आल्याने खाण्यापिण्याच्या साहित्यासह अन्न धान्य व विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.

डहाणू शहरातही अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रात्रीपासून पावसाचा कहर चालू असून शहरातील विद्युत पुरवठाही बंद झाला आहे. पावसाच्या पाण्यात काही ठिकाणी विषारी साप व अन्य प्रकारचे प्राणी, किटक इत्यादी निघत असल्याचेही काही लोकांनी सांगितले. त्यामुळे लोकांना रात्रभर आपला जीव मुठीत घेऊन घरांमध्ये बसावे लागले. डहाणूतील वरोर या ठिकाणी रस्त्यावर गुडघ्याच्यावर पाणी रस्त्यावर आल्याने सागरी मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे.

- Advertisement -

केळवे परिसरालाही पावसाने झोडपून काढले आहे. या ठिकाणी पूरसद़ृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. केळवे रोड परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने केळवे रोड रेल्वे परिसरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. जिह्यातील वैतरणा आणि सूर्या नदीसह लहान मोठे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मासवण नदीला पूर आल्याने वसई-विरार महापालिका हद्दीत पाणी पुरवठा करणारे पम्पिंग स्टेशन पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत वसई-विरार परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर शहराला पाणी पुरवठा सुरु होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -