घरमहाराष्ट्रराज्यात दोन दिवसात पाऊस

राज्यात दोन दिवसात पाऊस

Subscribe

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात सध्या पाऊस सुरू झाला आहे. येत्या ४८ तासांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.

नैऋत्य मान्सूनसाठी महाराष्ट्रात आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मध्य अरबी सागरापासून गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा सागरी किनारा तसेच बंगालच्या मध्य आणि उत्तर भागातील खाडीच्या परिसरात येत्या २४ तासांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनमध्ये आणखी सुधारणा होत महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक, तेलंगणा, रायळसीमा, आंध्र प्रदेशचा समुद्र किनारा आदी भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता येत्या २४ तासांमध्ये वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

मान्सूनची ऑनसेट लाईन ही १८ डिग्री उत्तर दिशेने हरणाई, सोलापूर, रामगुंडम, जगदलपूर आदी भागातून क्रॉस झाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात मान्सूनसाठी आता पोषक वातावरण तयार होण्यासाठी मदत झाली आहे. याचा परिणाम म्हणजे येत्या ४८ तासांमध्ये मान्सूनसाठी आणखी पोषक स्थिती निर्माण होईल. या अंदाजाच्या नुसार ४८ तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याआधी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात १२ जून तसेच १३ जूनला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. बुधवारी रात्री उशिरा नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातुर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर या ठिकाणी काही तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

तळकोकणातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशातही अनेक भागांत मान्सूनने हजेरी लावली आहे. राज्यात सक्रिय होणार्‍या मान्सूनमुळे अनेक दिवस पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला एक मोठा दिलासा मिळणार आहे. निसर्ग वादळानंतर राज्यात काही भागांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली होती. त्यानंतर अनेक शेतकर्‍यांनी आपल्या पेरणीच्या कामालाही सुरुवात केली होती. पण मधल्या काळात पावसाची हजेरी लांबल्याने शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पण हवामान विभागानेच येत्या ४८ तासांमध्ये मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज मांडल्याने आता शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -