राज्यात पुढील पाच दिवस ‘मुसळधार’च; 12 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार

गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह आसपासच्या परिसरात तुफान बॅटींग केली आहे. अशातच येत्या 12 सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचत आहे. सध्या राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 12 सप्टेंबरपासून राज्यात पावासाचा जोर वाढणार आहे. कोकणसह मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार असून, घाट भागातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील चार ते पाच दिवस मान्सून महाराष्ट्रात सक्रीय राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसानं हजेरी लावली आहे. आजही हवामान विभागाने राज्यात पावासाचा इशारा दिला आहे.

संपूर्ण राज्यात हवामान विभागाकडून यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा झाला.


हेही वाचा – याकूबच्या चुलत भावासोबत फडणवीस, राज्यपाल कोश्यारींचा फोटो! विरोधकांकडून भाजपच्या आरोपांवर पलटवार