राज्यात पावसाचा जोर कायम

पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज, तर कोकण, पुणे, नाशिकला रेड अलर्ट, पुणे, नवी मुंबई, पालघरमधील शाळांना सुट्टी

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसोबतच उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मागील ४ दिवसांपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूरमधील नदीनाले दुथडी भरून वाहू लागल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे-रस्तेमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडून पडली आहे. अशात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्याला पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर पुढील ४८ तासांत मुंबईसह कोकण आणि पुणे, नाशिकमध्ये अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरातील सखल भागांत पाणी साचले होते. अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पावसाची संततधार कायम असल्याने रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या सरासरी २० मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी सर्वच स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रस्ते जलमय झाल्याने खड्ड्यांतून वाहने काढताना चालकांचा कस लागत होता. रस्ते वाहतुकीची गतीही मंदावली होती.

ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, कोकणसह संपूर्ण राज्यात दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात
पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सकाळपासूनच मी सर्व जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात आहे. तसेच रात्री उशिरा मुख्य सचिव शिवकुमार श्रीवास्तव यांच्याशी मी चर्चा केली आहे. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये हाच आमचा प्रयत्न आहे, पण काही दुर्घटना घडल्यास यंत्रणा तत्काळ त्या ठिकाणी पोहचू शकेल.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

वसईत दरड कोसळून २ जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे वसईच्या राजवली वाघरल पाडा परिसरात दरड कोसळली. या दरडीखाली ६ जण अडकले होते. त्यापैकी ४ जणांची सुखरूप सुटका करण्यात स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, तर या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात १ जूनपासून ८९ जणांचा मृत्यू
विविध जिल्ह्यात पावसाच्या तडाख्यामुळे १ जूनपासून आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाला असून १८१ जनावरेही दगावली आहेत.

मोडकसागर भरून वाहू लागला
ठाणे जिल्ह्यात सलग दुसर्‍या आठवड्यात सरासरीच्या दुप्पट ६८५.३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३९५.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे, तर मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या शहापूर तालुक्यातील ७ तलावांपैकी एक मोडकसागर तलाव भरून वाहू लागला आहे.

आज शाळा बंद
हवामान विभागाने १४ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पुण्यातील शाळांना ३ दिवस, तर नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील शाळा आज एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधार्‍यांकडून घेण्यात आला आहे.