Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राज्यभरात पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस

राज्यभरात पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस

Subscribe

कोकणाला पावसाने झोडपले, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

दोन दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर मुंबईत सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी मागील 5 दिवसांत कोकणाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या कापसाळ सुर्वेवाडी येथील महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन तासांपासून चिपळूणमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या 20 जवानांचे पथक चिपळूणमध्ये दाखल झाले आहे, तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देत पुढील 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, मंडणगड, खेड या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच, राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला देखील पूर आल्याचे चित्र सध्या आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून पावसात जोर कायम राहिल्यास शेतीचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. लांजा तालुक्यातील विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंजणारीवरचा स्टॉप येथे मुंबई-गोवा महामार्गालगत ठेवण्यात आलेला मातीचा भराव पावसामुळे जवळच्या घर, दुकानात शिरून सामानाचे नुकसान झाले.

- Advertisement -

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतीतास वेगाने वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस, तर 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील 4 दिवस महाराष्ट्र – गोवा सागरी किनार्‍यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनार्‍यावर 4 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

*जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश*

*रायगड, रत्नागिरीमधील काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवर*

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या

- Advertisment -