अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यातील १२४१ हेक्टरवरील पिकांना तडाखा

नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे 1241 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. त्यात प्रामुख्याने मका, सोयाबीन व भात या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून जोरदार पावसाला सुरवात झाली. सलगपणे आलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम घाट परिसरात नद्या, नाले दुथडीभरून वाहत असून जिल्ह्याच्या पूर्व भागातही एक-दोन दिवस जोरदार पाऊस झाला. यामुळे नुकतेच पेरणी केलेल्या खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यात 52 हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले आहे. मक्याचे 325 हेक्टर, सोयाबीनचे 740 हेक्टर, भाजीपाला व ऊस पिकाचे 65 हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. निफाड, कळवण, दिंडोरी या तालुक्यांत प्रामुख्याने सोयाबीनचे नुकसान झाले असून कळवण, देवळा व निफाड तालुक्यात मकाचे नुकसान झाले आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाऊस असला तरी केवळ सुरगाणा तालुक्यातच भाताचे नुकसान झाले आहे.