घरमहाराष्ट्रक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू

क्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू

Subscribe

मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र कोसळलेल्या दरडीखाली तब्बल ८९ जणांचा बळी गेला.

मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र कोसळलेल्या दरडीखाली तब्बल ८९ जणांचा बळी गेला. रायगड जिल्ह्यातील महाडमधील तळीये गावात दरड कोसळून त्यात ३५ गावे दबली गेली. क्षणार्धात सारं काही गाडलं गेलं. या दुर्घटनेत ३८ जणांचा बळी गेला. कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. सातार्‍यातील आंबेघर येथे दरड कोसळून १२ जण मृत्युमुखी पडले. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले, सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन दरडीखाली ११ जणांनी आपला प्राण सोडला. चिपळूणमधील पोसरे बौद्धवाडीवर दरड कोसळून १७ जण ठार झाले. सातार्‍यातील वाई येथे दोन महिलांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. तर कणकवली दिगवले येथे दरड कोसळून १ महिलेचा मृत्यू झाला. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे चिपळूण अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटरमध्ये पाणी शिरल्याने व्हेंटिलेटर्स निकामी होेऊन ८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.

पावसाने असा आकांत माजवला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन बचाव कार्याबाबत सूचना करत होते. अजित पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा करून बचाव कार्यासाठी लष्करामार्फत मदत करण्याची मागणी केली. दुर्घटनास्थळी एनडीआरएफ, नौदलाची पथके तैनात आहेत. तसेच राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे प्रयत्न होत आहेत. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात फसलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची तर केंद्र सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर इलाज मोफत केले जाणार असल्याची घोषणाही राज्य सरकारने केली आहे.

- Advertisement -

तळीये गावावर दरड कोसळल्याने 80 जण ढिगार्‍याखाली, 38 मृत्यू

महाड तालुक्यावर निसर्गाचा पुन्हा एकदा महाप्रचंड कोप झाला असून, तालुक्यातील तळीये गावातील कोंडाळकर कोंड वस्तीवर दरड कोसळून 8० जण मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले असून, त्यापैकी 32 जणांचे मृतदेह मातीखालून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. मात्र क्षणार्धात सारं काही गाडलं गेलं. या भयावह घटनेमुळे तालुक्यात २६ जुलै २००५ ची पुनरावृत्ती झाली, तर 30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची स्मृतीही जागी झाली. तळीये दुर्घटनेनंतर दरडींच्या समस्यांकडे पाहण्याचा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा दृष्टीकोन अद्यापही बेफिकिराचा असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने बुधवारपासून अधिक जोर पकडला आहे. गुरुवारी शहर आणि परिसरात पूर आल्यामुळे जवळपास संपूर्ण तालुक्यातील वीज यंत्रणा नेहमीप्रमाणे कोलमडली असून, दुर्दैवी तळीये गावातही वीज नव्हती. गुरुवारी सायंकाळनंतर संपूर्ण गावात शुकशुकाट झालेला असताना कोंडाळकर कोंडमधील रहिवाशांना थोड्या वेळात आपल्यापुढे संकट वाढून ठेवल्याची पुसटशीही कल्पना नसेल. दरड कोसळण्याची शक्यताही कुणी गृहित धरली नसल्याने सर्वजण निर्धास्त होते. मात्र, सायंकाळी ७ वाजल्यानंतर दरड कोसळण्यास सुरुवात झाली आणि काही क्षणातच ही वस्ती भूईसपाट झाली आणि एकच हाहा:कार माजला. महाडपासून ही वस्ती 16 किलोमीटर अंतरावर वरंध मार्गावर आहे.या दुर्घटनेत जवळपास ३२ घरे दरडीखाली सापडली. घरांचे अवशेष देखील यामध्ये दिसून येत नसून घरांतील सामान डोंगर माथ्यावरून खाली पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले. घटनेनंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले. मात्र, पाऊस आणि रात्रीच्या वेळेमुळे प्रयत्न असफल झाला.

- Advertisement -

काही तासांनी शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोध कार्य सुरू झाले. एनडीआरएफचे पथक दाखल झाल्यानंतर शोध कार्याला वेग आला. मात्र, डोंगरातील मातीसह संपूर्ण वस्ती घरंगळत खाली गेल्याने बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. सायंकाळ उशिरापर्यंत 32 मृतदेह सापडले असून, शोध कार्य रात्रीही सुरूच ठेवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, स्थानिक आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दुर्घटनेची व्याप्ती लक्षात घेऊन ठिकठिकाणाहून रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत मागविण्यात आली असून, पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

26 जुलै 2005 रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी दरडी कोसळून 125 हून अधिक जणांना त्यात प्राण गमवावे लागले होते. थोड्या फार फरकाने अशी नैसर्गिक आपत्ती दरवर्षी येत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी याकडे आस्थेने पाहत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आता पुन्हा एकदा कागदी घोडे नाचवून नक्राश्रू ढाळले जातील, अशी प्रतिक्रियाही सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, शहरात आलेल्या पुराचे पाणी ओसरले असले तरी यात प्रचंड वित्तहानी झाली आहे. अनेक सोसायट्यांमधून दुसर्‍या मजल्यापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने घरांची वाताहात झाली आहे. शहरातील वीज पुरवठा खंडित असून, मोबाईल यंत्रणाही ठप्प झाल्याने संपर्क साधणे अवघड झाले आहे. शासकीय यंत्रणांनी मदत कार्य सुरू केले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे न

दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना केंद्राचे दोन लाख, राज्याचे पाच लाख
राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केली. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले.

या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झाली आहे. मात्र, अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बचाव कार्य आणि रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरले आहे; पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोल्हापूरला वेढा ! पंचगंगाची पातळी 53 फुटांवर दोन गावे पूर्णपणे पाण्याखाली

राज्यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांसह आता कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या गावातील घरांमध्ये दुसर्‍या मजल्यापर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यांना घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी 53 फुटांवर गेल्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावे पाण्यात बुडाली आहेत. 2019 च्या महापुरातही ही गावे पाण्यात बुडाली होती. त्यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याचे आवाहन रेस्क्यू टीमकडून करण्यात येत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कोल्हापूर शहरातून महामार्गाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. नदीच्या पाणीपातळीत अशीच वाढ होत राहिली तर परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे.

पोलादपुरात दरड कोसळून १० जणांचा मृत्यू

गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्याची पुरती दैना उडवून टाकली असून, दरड कोसळण्याच्या दोन दुर्घटनांत 10 जणांचा मृत्यू झाला, तर १ जण बेपत्ता आहे. नैसर्गिक संकटे पाचवीला पुजलेल्या या तालुक्यावर निसर्गाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला आहे. केवनाळे आणि साखर सुतारवाडी येथे दरड कोसळून प्रत्येकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. केवनाळे गावावर डोंगर कोसळून 7 ते 8 घरे दरडीखाली गाडली गेली. या गावातील राम अंगोडे (५०) यांनी ग्रामस्थांना ‘पळा-पळा’ असे ओरडून सावध केले. मात्र, वेळेत बाहेर न पडू शकलेले एका घरातील गेणू गणपत दाभेकर (७५), इंदिराबाई गेनू दाभेकर (७0), नातू सुनील केशव दाभेकर (32), शिल्पा सुनील दाभेकर (28) आणि महादेव देवू कदम यांचा ढिगार्‍याखाली सापडून मृत्यू झाला. दाभेकर कुटुंब दुपारचे जेवण करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली. यात 9 जण गंभीर जखमी असून, अन्य घरांतून वेळीच बाहेर पडल्याने बचावले.

साखर सुतारवाडी गावावर दरड कोसळून त्यात ५ जण मृत्युमुखी (यांची नावे समजू शकली नाहीत) पडले, तर एकजण बेपत्ता आहे. प्रतापगड पायथ्याशी आंबेमाची येथे दरड कोसळली असून, मदतीसाठी एनडीआरएफचे पथक तेथे पोहचले आहे. दरम्यान, दरडी कोसळत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. गोरद फाटा, घोडवली नदी, तरई येथील पूल वाहून गेले असून, पर्यटकांचा आवडता गोपाळवाडी येथील झुलता पूलही वाहून गेला आहे. याशिवाय शहराला पाणी पुरवठा करणारी नगरपंचायतीची विहीर पुरात वाहून गेली आहे. संततधार सुरूच असल्याने वीज पुरवठा ठप्प असून, इंटरनेट सेवाही कोलमडली आहे.

महापूराने चिपळूणच्या कोविड रुग्णालयात ८ रुग्णांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे चिपळूणमधली पूरस्थिती अधिक बिकट झाली आहे. पूराच्या पाण्याने कोवीड रुग्णालयालाही वेढा घातला असून यादरम्यान, ८ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ऑक्सिजन अभावी हे मृत्यू झाल्याचा आरोप कोरोनामृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. चिपळूणमध्ये ढगफुटी झाल्याने रस्ते, घरे , बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. तर इमारती व रुग्णालयांमध्येही पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्याने येथील कोवीड सेंटरलाही वेढले आहे. यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सही सेंटरपर्यंत पोहचू शकत नाहीये. याचदरम्यान, या कोवीड सेंटरमध्ये ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोवीड सेंटरला चारही बाजूने पूराच्या पाण्याने वेढल्याने रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहचले नाही यामुळेच आमची माणसं गेली असा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यात धरणे आणि नद्या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी धरणाचे पाणी सोडावे लागत आहे. त्यानुसार नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हे सगळे करत असताना कोरोनाचे संकट टळलेले नाही. परदेशातही अशा अतिवृष्टी आणि पुराच्या बातम्या आपण पाहत आहोत. आपण सर्व मिळून संकटाला तोंड देत आहोत.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

प्रशासकीय यंत्रणा सुमारे २० ते २२ तासांनी दुर्घटनास्थळी पोहोचली. भावनाशून्य प्रशासन आणि बेजाबदार सरकारमुळे येथील पूरग्रस्तांना वेळीच मदत पोहोचली नाही. पावसाची तमा न बाळगता विरोधी पक्षातील नेते या ठिकणी वेळेत पोहोचू शकतात तर सत्ताधारी मंत्री, आमदार आणि प्रशासकीय यंत्रणेतील बेजबाबदार बाबू कुठे गायब झाले होते? -प्रवीण दरेकर,विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -