सिंधुदुर्ग, बारामतीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

heavy unseasonal rain with strong winds Sindhudurg Baramati
सिंधुदुर्ग, बारामतीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या असानी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बारामतीमध्येसुद्धा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राज्यातील नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहेत. परंतु या उकाड्यादरम्यान हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. काही तासांसाठी वातवारणात गारवा राहील. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना फटका बसला आहे. तसेच पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बारामतीमध्ये २० ते ३० मिनिटे विजांच्या कडाक्यासह पाऊस पडला. काही काळ धो-धो पाऊस पडल्यानंतर विश्रांती घेतली आहे.

वादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार सरी शक्य: पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

आंबोली येथून प्रवास करणारे प्रवाशी सुखावले

अंबोलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अल्हाददायक क्षण अनुभवला आहे. दाट धुके आणि धो-धो बरसणाऱ्या पावसादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उकाड्यातून गारवा जाणवला. घाटात काही प्रवाशांनी थांबून या क्षणाचा आनंद घेतला आहे.


हेही वाचा : VIDEO : असानी चक्रीवादळाच्या थैमानात समुद्रातून आला सोन्याचा रथ, पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी