घरमहाराष्ट्रमदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

Subscribe

ग्रामपरिवर्तकांमुळे पूरग्रस्तांना तात्काळ मदत
राज्यात निर्माण झालेल्या महाभयंकर पूरस्थितीला सर्व स्तरांतून मदत दिली जात आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक देखील गावात जाऊन मदतकार्य करत आहेत. पूरग्रस्त गावातील प्रत्येक कुटुंबाला हे ग्रामपरिवर्तक भेटून त्यांना शासनाची मदत मिळाली आहे की नाही याची पडताळणी करीत आहेत. त्यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करून लगेचच दुसर्‍या दिवशी पीडित कुटुंबांना मदत पुरवली जात आहे. व्हीएसटीएफचे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक या कार्यात धडाडीने सहभागी होत असल्याने शासनाला पीडित कुटुंबांना तात्काळ मदत पुरविणे शक्य होत आहे. मुंबईचे आयुक्त प्रवीणसिह परदेशी व सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना -अंतर्गत विविध जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या ३० ते ३५ ग्रामपरिवर्तकांना सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस आणि वाळवा या तीन पूरग्रस्त तालुक्यांमध्ये मदतकार्यासाठी पाठविण्यात आले. यावेळी व्हीएसटीएफचे जिल्हा समन्वयक दिलीप पाटोळे हे ग्रामपरिवर्तकांसोबत सांगली जिल्ह्यात उपस्थित होते. शासन तसेच नागरिकांकडून होत असलेली मदत पीडित कुटुंबांपर्यंत तात्काळ पोहचण्यासाठी व्हीएसटीएफची टीम कार्यरत आहे.

अ‍ॅस्टर व्हॉलंटियर्स प्रोग्रामअंतर्गत ८००० पूरग्रस्तांना मदत
पूरग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी कोल्हापुरातील अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमधील जवळपास ५०० अ‍ॅस्टर स्वयंसेवकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला मोलाचे सहकार्य केले. पूरग्रस्तांना खाद्यपदार्थांच्या १२,००० पाकिटांचे वाटप केले गेले, ३५ मदत शिबिरे चालवली गेली आणि रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी दर दिवशी ८ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. जवळपास ५०० स्वयंसेवक अहोरात्र मदतकार्यात गुंतलेले होते.

- Advertisement -

दर दिवशी त्यांनी खाद्यपदार्थांची ४०० पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवली. अतिशय गंभीर काळात त्यांनी एकूण १२,००० पूरबाधितांना अन्नाची पाकिटे पुरवली. याखेरीज जेव्हा पूर खूप जास्त होता त्या आठही दिवसात अ‍ॅस्टर स्वयंसेवकांनी ३५ मदत शिबिरे चालवली आणि आजारी व्यक्तींना तातडीने उपचार सेवा मिळाव्यात यासाठी ८ रुग्णवाहिका सदैव सज्ज ठेवलेल्या होत्या. अ‍ॅस्टर स्वयंसेवकांनी गरजूंना औषधांचेही वाटप केले. पूरग्रस्तांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा नीट मिळाव्यात याची पूर्ण काळजी अ‍ॅस्टर स्वयंसेवकांनी घेतली.

दहीहंडीची रक्कम पूरग्रस्तांना
पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुरानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन येथील टोकरे फाऊंडेशनचा यंदाचा दहीहंडी उत्सव पूरग्रस्तांना समर्पित करण्याचा ऐतिहासिक निर्णय फाऊंडेशनने घेतल्याची माहिती अध्यक्ष व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिली आहे. शहरातील सगळ्यात मोठी ही दहीहंडी असून, मुंबईसह ठाणे, पुणे येथून गोविंदा मंडळ ही हंडी फोडण्यासाठी येत असतात. मात्र यावेळचे पश्चिम महाराष्ट्रावरील संकट लक्षात घेता या उत्सवावरील खर्च व बक्षीस रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे टोकरे यांनी सांगितले. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

- Advertisement -

कुरुंदवाडात घरगुती वस्तूंचे वाटप
कोल्हापूर तालुक्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड या गावाला महापुराचा सर्वात जास्त फटका बसला. अनेक जुनी घरे कोसळली, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, अशा पूरग्रस्त गावातील गावकर्‍यांना घरगुती वस्तूंचे अखिल भटवाडी उत्सव मंडळाच्या वतीने व भटवाडीच्या जनतेच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
उत्सव मंडळाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भटवाडी येथील नागरिकांना मदतीचे केलेल्या आवाहनाला नागरिकांनी स्वेच्छेने केलेल्या मदतीच्या घरगुती वस्तू कुरुंदवाड गावातील लोकांना घरोघरी जाऊन त्यांना नात्यातील आपलेपणा देत मदत देण्यात आली. त्यावेळी मंडळाचे विश्वस्त दशरथ शिर्के, अध्यक्ष मंगेश परब, कार्याध्यक्ष अभिषेक घाग, महेश पोळ, रोशन हाडवळे, दिनेश खानविलकर,आप्पा चव्हाण आदी उपस्थित होते. पुरात अडकलेल्या साने गुरुजी विद्यालयाला देखील मंडळाने वह्या, पेन, चटई, बिस्किटे वाटप करण्यात आली.

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि परिसरात लाखोंच्या संख्येने विविध राज्यांतून येणार्‍या अनुयायांची नियोजनबद्ध नि:स्वार्थ सेवा करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भरीव आर्थिक मदत केली. अतिवृष्टी व पुरामुळे बेघर झालेल्या नागरिकांना प्रत्यक्ष भेटून दैनंदिन वापरातील विविध जीवनावश्यक वस्तू, औषधे, तांदूळ, गहू, दूध पावडर, बिस्किटे, चादरी, सॅनेटरी नॅपकीन्स इत्यादींची मदत करण्याचा संकल्पही समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे प्रमुख मार्गदर्शक भन्ते करुणानंद थेरो, भन्ते साधनानंद थेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेन्द्र साळवे, चंद्रशेखर कांबळे, शिरीष चिखलकर, शैलेंद्र मोहिते, सदानंद मोहिते, अ‍ॅड. अभया सोनावणे, स्नेहा भालेराव इत्यादी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
वाडा तालुक्यातील पिंजाळ व महानदी या दोन्ही नद्यांमध्ये धरणाचे पाणी समुद्रात भरती असतानाच अचानक सोडण्यात आल्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका 621 विद्यार्थी असलेल्या पाली आश्रमशाळेला बसला. आमची वसई सामाजिक संस्थेने या 621 विद्यार्थ्यांना जीवनावश्यक आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

आश्रमशाळा नदीपासून 30 फूट उंच असूनही शाळा परिसरात 10 फूट पाणी शिरले होते. त्यामुळे 621 विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य, चादरी, गाद्या, पेट्या व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या होत्या. या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आमची वसईने सर्व सदस्यांना व नागरिकांना वस्तूरूपी मदतीचे आवाहन केले. आवाहनाला उदंड प्रतिसाद देत धर्मसभा, विविध सामाजिक संस्था,गृह निर्माण संस्था, व्यावसायिक, राजनैतिक पक्ष व असंख्य जागृक नागरिकांनी सढळ हस्ते मदत केली. शेकडो चादरी, ब्लँकेट, पाच हजार वह्या, कंपास, पेन, पेन्सिल, ताटे, वाट्या, पेले, अन्नधान्य, कपडे, सुका खाऊ, टूथपेस्ट, ब्रश, साबण, मच्छर अगरबत्ती, मेणबत्त्या, बादल्या इत्यादी जीवनावश्यक व शैक्षणिक साहित्य यावेळी वाटण्यात आले. आमची वसईने विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना शिक्षणात खंड पडण्यापासून वाचवले,असे उद्गार शाळा मुख्याध्यापकांनी काढले. डॉ. चिंकी दुबे व रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

बँक ऑफ इंडिया, ठाणे शाखेची पूरग्रस्तांना मदत
डिजिटल शाखा म्हणून मान्यता पावलेली ठाण्याच्या शिवाजी पथावरील बँक ऑफ इंडिया, ठाणे (मुख्य) शाखेचे सामाजिक बांधिलकी जपणारे कर्मचारी सांगलीच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. कर्मचार्‍यांनी निधी संकलन करून ही मदत थेट ११ पूरग्रस्त कुटुंबांना त्यांच्या दारात नेऊन दिली. त्यात कपडे, किराणा सामान, चादर, चटई व रोख रकमेचा समावेश होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश कदम, दिलीप चव्हाण, सुबोध गायकवाड व विक्रम खराडे यांनी विशेष पुढाकार घेतला त्याबद्दल ते कौतुकास पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदत
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील गु.रा. अग्रवाल विद्यामंदिर व कै. एस.पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी १० हजार १०० रुपयांचा निधी संकलित करण्यात येऊन ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठविण्यात आली आहे. निधी संकलनासाठी राष्ट्रीय सेवा योजना, आर. एस. पी. चे विद्यार्थी, तसेच प्राचार्य के. एल.जांभळे, उल्हास ठाकूर, एस. पी. मिसाळ, ए. आर. गावित आणि अन्य शिक्षकांचे सहकार्य लाभले.

पूरग्रस्तांच्या आरोग्याबाबत ‘माहिती पुस्तिका’
पूरग्रस्तांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलकडून पुढाकार घेण्यात आला असून पूरस्थितीत किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर इथल्या लोकांचे बरेच नुकसान झाले आहे. शिवाय आरोग्यविषयक गंभीर समस्या इथे उद्भवल्या आहेत. या आणि अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीवर मार्गदर्शन करण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. आरोग्यविषयक उद्भवणार्‍या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जे.जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी माहिती पुस्तिका काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, सहयोगी अधिष्ठाता आणि रोगप्रतिबंधक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रंजीत माणकेश्वर यांनी ही माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका शासनाकडे पाठवण्यात आली आहे. पूरानंतर अनेक संसर्गजन्य आजारांसोबत पूरग्रस्तांचे मनोबल खचले असेल तर त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे हे जाणून याबाबत देखील पुस्तकात मुद्दे मांडण्यात आले आहेत. ही पुस्तिका संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -