घरदेश-विदेशपंढरीआधी दिल्लीवारी ! मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भेटीला

पंढरीआधी दिल्लीवारी ! मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भेटीला

Subscribe

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीवारी केली. आपल्या दिल्लीवारीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी दिल्लीत दिली, मात्र हा विस्तार नेमका कोणत्या दिवशी अथवा किती टप्प्यात होईल यावर भाष्य करण्याचे टाळत शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आणखी ताणली आहे. त्याचवेळी माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाल्याने मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल असे संकेत शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केल्यानंतर शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत आल्यानंतर दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. मध्यरात्री उशिरापर्यंत अमित शहा यांच्यासोबत चाललेल्या बैठकीत तिघांमध्ये मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचे सूत्र आणि मंत्र्यांची संख्या यावर प्रदीर्घ चर्चा होऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारले असता आषाढी एकादशीची महापूजा झाल्यानंतर आपण मुंबईत जाणार आहोत. मुंबईत फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपण मंत्रिमंडळ विस्तार करू आणि तो विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होईल, असे त्यांनी सांगितले.

१८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे अधिवेशन मागे पुढे होईल, असे सांगताना दिल्ली भेटीत खातेवाटपाबाबत चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री तसेच अमित शहा यांना भेटल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेनेने शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. यावर सोमवारी सुनावणी होत आहे. या सुनावणीत न्यायालय काय म्हणते हे पाहून मंत्रिमंडळ विस्ताराचा सोपस्कार पार पाडला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बंड नव्हे क्रांती
आघाडी सरकारमध्ये असताना आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होतो. आम्हाला सभागृहात सावरकरांबद्दल बोलता येत नव्हते. आघाडीतील सहकारी पक्षांमुळे शिवसेना आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आमचा हा निर्णय म्हणजे बंड नव्हे, गद्दारी नव्हे, तर उठाव आणि क्रांती आहे, असे शिंदे म्हणाले. कोणताही आमदार पैशांच्या मागे लागून आला नाही. आरोप करणारे लोकांची दिशाभूल करीत आहेत. आता कुणीही काहीही बोलले तरी त्याचा परिणाम होणार नाही. आम्ही आमचे काम करीत राहू, असे एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आमचे बहुमताचे सरकार आहे. नियमाप्रमाणे आम्ही सरकार स्थापन केले आहे. आम्ही काहीही नियमबाह्य केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांनी मला शिवसेना विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून मान्यता दिली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली : फडणवीस
दरम्यान, खरी शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचले. मुख्यमंत्री हेच नेते असतात. त्यामुळे या सरकारमध्ये शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार यशस्वी करण्यासाठी आपण सर्व सहकार्य करू, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -